बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

धक्कादायक! नवीन वर्षात शेतकरी आत्महत्येची दुर्दैवी मालिका… 22 दिवसांत 12 शेतकर्‍यांचा प्राणत्याग!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरत्या वर्षात कोरोनाचा कहर कायम राहिला, त्यात अघोषित ओल्या दुष्काळाची भर पडली. यामुळे दैनंदिन समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जिल्ह्यातील 262 शेतकर्‍यांनी असहाय स्थितीत आत्महत्येचा अंतिम पर्याय निवडला. शासकीय अनास्थेमुळे तोच आत्महत्येचा सिलसिला यंदाही सुरूच असून, गेल्या 22 दिवसांत 12 शेतकर्‍यांनी मरणाला कवटाळल्याने दुर्दैवी चित्र बुलडाणा लाइव्हच्या समोर आले आहे.
वर्षानुवर्षे सुरू असलेली बळीराजाच्या आत्मघाताची मालिका म्हणजे मातृतीर्थ जिल्ह्यावरील काळा डाग ठरला आहे. महाभारतातील अश्‍वत्थामाच्या जखमेसारखी कधी न भरून निघणारी, चिघळतच राहणारी जखम आहे. मात्र यावर सर्वपक्षीय राज्यकर्त्यांकडून काहीच ठोस, कृती वा उपाययोजना झाली नाही. नेत्यांसाठी तो एक गंभीर इव्हेंट तर यंत्रणांसाठी एक प्रकरण ठरलं! यामुळे गत वर्षातही आत्मघातांचा सिलसिला कायम राहिला. 2020 मध्ये तब्बल 262 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. मात्र याकडे नेते व अधिकार्‍यांनी त्याकडे क्रिकेटच्या 20- 20 मॅच सारखे पाहिले अन् सोडून दिले. सुल्तानीची अशी तर्‍हा तर अस्मानीने अतिवृष्टी करत खरीप हंगाम उद्ध्वस्त करून टाकला. यामुळे ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक म्हणजे 31 आत्महत्या झाल्या. सरासरी काढली तर दिवसाकाठी 1 आत्महत्या! हंगामापूर्वी म्हणजे मे महिन्यात विविध समस्या भेडसावणार्‍या 30 जणांनी आत्मघाताचा अंतिम पर्याय निवडला. सप्टेंबरमध्ये 27 आत्महत्या, जुलैमध्ये 26, नोव्हेंबरमध्ये 22, फेब्रुवारी व मार्चमध्ये प्रत्येकी 21, जानेवारी व ऑगस्टमध्ये प्रत्येकी 18, जूनमध्ये 17, एप्रिलमध्ये 14 अशी ही आकडेवारी. वर्षाअखेरीस डिसेंबरमध्ये 16 कास्तकारांनी आत्मघात करून जगाचा निरोप घेतला. नवीन वर्षात ही दुर्दैवी मलिक कायम असून 22 जानेवारी 2021 अखेरीस 12 आत्महत्यांची नोंद झाल्याचे वृत्त आहे. यावर कळस म्हणजे यातील फक्त केवळ 44 कुटुंबच तोकड्या शासकीय मदतीस पात्र ठरले. 76 कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: