बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

धामणगाव बढेच्‍या महिला सरपंच मुख्यमंत्र्यांना म्‍हणाल्या, असे केले आम्‍ही गाव कोरोनामुक्‍त!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले.. आमच्या गावातही कोरोनाने प्रवेश केला… रुग्णसंख्या वाढली.. साहेब आपण लॉकडाऊनचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आमच्या ग्रामपंचायतीने कोटेकोर पालन करत स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनांने पालन केले. आपल्या या निर्णयामुळे कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. मुख्यमंत्री साहेब… यापुढेही आपल्या प्रत्येक सूचनेचे पालन करून माझी ग्रामपंचायत धामणगाव बढे गाव कोरोनामुक्त ठेवणार आहे, असा संकल्प आज, 11 जूनला मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील सरपंच जिनत प्रविन शेख अलीम कुरेशी यांनी केला. प्रसंग होता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन सरपंच संवादाचे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अमरावती, नागपूर व औरंगाबाद विभागातील सरपंचांशी ऑनलाईन आभासी पद्धतीने कोरोना परिस्थिती व कोरोनामुक्त गाव विषयावर संवाद साधला. या संवादासाठी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील सरपंचांची निवड झाली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी कोरोना परिस्थिती, कोरोनामुक्त गाव ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींनी केलेले प्रयत्न, लसीकरणाची स्थिती, लसीकरणासाठी केलेले प्रयत्न, कोरोना संसर्ग न होण्यासाठी नियमांचे पालन, विलगीकरण कक्ष, औषध पुरवठा आदींविषयी संवाद साधला. कोरोना मुक्तीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. सरपंच जिनत प्रविन शेख अलीम कुरेशी यावेळी संवाद साधताना म्हणाल्या, मी माझे गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावात दक्षता समिती सक्रीय केली. ती गावच्या सीमेवर तैनात ठेवून बाहेरून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले. गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण केले व कोरोना तपासणी करूनच गावात प्रवेश दिला. त्यासाठी गावात लोकवर्गणीतून सुसज्ज आयसोलेशन केंद्र उभारण्यात आले. या ठिकाणी औषधोपचाराची व्यवस्था केली. या केंद्रावर ग्रामपंचायत सदस्यांच्यासुद्धा ड्युट्या लावल्या.

मणगाव बढे हे परिसरातील मोठे गाव व खेडी जोडलेले गाव असल्यामुळे गावातील आठवडी बाजार संपूर्ण बंद केला. कोरोना संसर्ग नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत गाव पिंजून काढत नागरिकांना कोरोना विषयी जनजागृती केली. या मोहिमेत थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. गावात सायंकाळी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासमवेत लोकांच्या मनात जनजागृती केली. अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचा प्रयत्न केला. दिव्यांग, बेरोजगार नागरिकांना मोफत अन्न धान्याचे वाटप गावात केले. घरोघरी सॅनीटायझर, मास्क व रोग प्रतिकारक शक्तीवर्धक औषधांचे वाटप करण्यात आले. गावात रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त संकलन केले, असे त्‍यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, घाटबोरीचे सरपंच गजानन श्रीराम चनेवार आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: