क्राईम डायरीमुख्य बातम्या

धावत्या रेल्‍वेतून लांबवले होते ८ लाखांचे दागिने!; शेगाव रेल्‍वे पोलिसांनी “ट्युबलाईट’ला असे पकडले!!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवजीवन एक्‍स्‍प्रेसमधून प्रवासी झोपल्याचा फायदा घेत ८ लाख रुपयांचे दागिने चोरणाऱ्या रामेश्वर ऊर्फ ट्युबलाईट देविदास राठोड याला शेगाव रेल्वे पोलिसांनी यवतमाळ येथून अटक केली. त्याच्याकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी ५ लाख ८ हजार ६०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार सागर गोडे यांनी आज, ५ ऑगस्टला पत्रकारांना ही माहिती दिली.

दागिने, मोबाइल पर्ससहित चोरल्याची ही घटना २७ एप्रिलला घडली होती. याप्रकरणी शेगाव रेल्वे पोलीस ठाण्यात आकाशकुमार रुपसिंग पुरोहित (रा. विजयवाडा, आंध्रप्रदेश) यांनी तक्रार दिली होती. तपास पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपास सुरू असताना चोरीला गेलेल्या मुद्देमालामधील मोबाइलचे लोकेशन ३० जुलैला पोलिसांना मिळाले.

त्यावरून पोलिसांचे पथक यवतमाळला रवाना झाले. चोरीला गेलेला मोबाइल जप्त केला व त्याच्या आधाराने मुख्य आरोपी रामेश्वर ऊर्फ ट्युबलाईट देविदास राठोड याला अटक केली. तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याने रेल्वेतून चोरलेले दागिने वाशिम येथून हस्तगत करण्यात आले. चोरलेली पर्स त्याने नांदुरा शिवारातील एका विहिरीत टाकल्याचे त्याने सांगितले. त्या विहिरीचा शोध घेऊन सर्पमित्र राजन बोहर, मोहन बेसोडे यांच्या मदतीने पर्सदेखील पोलिसांनी हस्तगत केली. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग (मनमाड) दिनकर काजवे यांच्या आदेशाने व शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील, पोहेकाँ राहुल गवई, पोहेकाँ सुनील कवाळकर, पोकाँ विशाल जाधव, पोकाँ महेश सेन यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: