खामगाव (घाटाखाली)मुख्य बातम्या

नक्षली बनण्याची धमकी देणार्‍या विद्यार्थ्याच्या मदतीसाठी धावली खामगाव अर्बन!; ‘बुलडाणा लाइव्ह’च्या वृत्ताची घेतली दखल

खामगाव (कृष्णा सपकाळ / ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बँकेने शैक्षणिक कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर हताश झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावातील फार्मसीच्या विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्येची परवानगी मागितली होती. परवानगी न दिल्यास नक्षली बनण्याची धमकी दिली होती. याबाबतचे वृत्त बुलडाणा लाइव्हने विद्यार्थ्याच्या व्हिडिओसह दिले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत त्याच्या मदतीसाठी खामगाव अर्बन बँक सरसावली. संग्रामपूर तालुक्यातील काटोडा येथील वैभव मानखैर या विद्यार्थ्याला बँकेने शैक्षणिक कर्ज मंजूर करून त्याला आज रकमेचा डीडी दिला आहे.

देशातील विद्यार्थ्यांना आज चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही चांगल्या शिक्षणापासून वंचित राहू नये. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले तर देशभक्त नागरिक तयार होतील, असे प्रतिपादन यावेळी खामगाव अर्बनचे अध्यक्ष आशिष चौबीसा यांनी केले. यावेळी बुलडाणा लाइव्हच्या मार्केट बूस्टर-1 या विशेष पुरवणीचेही विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, विभाग कार्यवाह प्रल्हाद निमकर्डे, विभाग प्रचारक वैष्णव राऊत, जिल्हा कार्यवाह विजय पुंडे, बँकेचे संचालक राजेंद्र राजपूत, सचिन पाटील, सौ. कोरडे ताई यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खामगाव अर्बन बँकेत बुलडाणा लाइव्हच्या मार्केट बूस्टर-1 पुरवणीचे प्रकाशन करताना मान्यवर.

कोण आहे हा विद्यार्थी…

बाबाराव मानखैर यांना दोन मुलं असून, मोठ्याचे नाव प्रसाद असून, वैभव लहाना आहे. प्रसाद शेतीत वडिलांना मदत करतो तर वैभव बारावीनंतर धुळे जिल्ह्यातील बोराडी येथील फार्मसी कॉलेजमध्ये बी. फार्मसीच्या दुसर्‍या वर्षात शिकतो. पहिल्या वर्षी वैभवला गुणही मिळाले. मात्र या वर्षी शेतात काही पिकलंच नाही. जवळ पैसा नसल्याने दुसर्‍या वर्षाचे शिक्षण थांबविण्याची वेळ वैभववर आली होती. वैभवने संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शैक्षणिक कर्जासाठी चार महिन्यांपूर्वी मोठ्या अपेक्षेने अर्ज केला. चार महिन्यांत अनेकदा बँकेचे खेटे घातले. पण उपयोग झाला नव्हता. वडिलांनी घेतलेल पीक कर्ज न भरल्याने तुला शैक्षणिक कर्ज देऊ शकत नाही, असे कारण बँकेने दिलं होतं.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: