बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

नागरिकांवर निर्बंध; कोरोनावर कोण निर्बंध घालणार? व्यापार लॉक; नागरिकांचा मुक्त संचार, कोविड मोकाट!!; दुसरीकडे बाधितांचा आकडा बाराशे पार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः जिल्ह्यात व्यापार-व्‍यवसायावर निर्बंध लादून अर्थव्यवस्था डबघाईस आणणारे राज्यातील आघाडी सरकार कोरोनाला कधी आटोक्यात आणणार, असा सवाल संतप्त नागरिकांतून विचारला जात आहे. रात्रंदिवस निर्बंधांच्या हातकड्या घालूनही कोरोना मोकाट नव्हे सुसाट निघाल्याने आता राज्य शासन प्रति असंतोष निर्माण झाला आहे. आघाडी शासनाच्या निर्देशांमुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केलेत. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नोकरशाही मुक्त, नागरिक मोकाट अन्‌ व्यापार, व्यापारी, लघु विक्रेते लॉक अन्‌ त्यांची रोजीरोटी डाऊन असे विचित्र चित्र निर्माण झाले आहे. अत्यावश्यक सेवां अंतर्गत येणाऱ्या दुकानांमुळे कोरोना फैलावत नाही. मात्र कापड, सराफा, हार्डवेअर, ऑटोमोबाईल, जनरल स्टोअर्स आदी दुकानामुळेच कोरोना फैलावतो असा शासनाचा समज आहे काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
कडक निर्बंध लादल्यापासून रुग्ण कमी होण्याऐवजी उलट वाढतच असल्याने सरकारचा समज चुकीचा आहे, असेच स्‍पष्ट मत जनमानसात व्‍यक्‍त होत आहे. 16 एप्रिलला तारखेला 1140 रुग्ण निघाले अन्‌ आज, 17 एप्रिलला 1285 पॉझिटिव्हचा भयंकर आकडा आलाय! बुलडाणा तालुक्यात 259 चा आकडा येणे नवीन बाब नाही. मात्र इतर तालुक्यांतील भयावह संख्या शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ठरावी. मेहकरने तीन आकडी संख्या गाठीत आज थेट द्विशतकी मजल व 204 ची संख्या गाठली! चिखली 128, लोणार 101, मोताळा 115, नांदुरा 87, सिंदखेडराजा 85, जळगाव जामोद 68,देऊळगावराजा 60, मलकापूर 51 या तालुक्यांतील कोरोनाचा निर्बंधाना वाकुल्या दाखवत झालेला फैलाव धोक्याची घंटा मानली जात आहे. राज्य शासनाला या घंटेचा आवाज कधी ऐकू येणार, हा नागरिकांचा सवाल आहे. संग्रामपूर तालुक्‍यात 1 रुग्ण आढळला आहे.
6 बळीही..
गत 24 तासांत कोरोनाच्या अदृश्य झंझावाताने केवळ 1285 जणांना घायाळ केले असे नव्हे तर तब्बल 6 जणांचे बळीही घेतले आहेत. बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील 3, शेगाव व खामगाव सामान्य रुग्‍णालयातील प्रत्येकी 1 तर लोणार कोविड केअर सेंटरमधील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अलीकडे मृत्यूमध्ये झालेली वाढ देखील घातक ठरणारी बाब आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: