बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

नितीन गडकरींनी घेतला बुलडाण्याच्‍या कोरोनाचा आढावा; ऑक्सिजन स्वावलंबनावर होता रोख, ‘ व्हीसी’ मध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या अन्‌ काहीसे नेतृत्वहीन झालेल्या विदर्भाला सर्वंकष दिलासा व मदत करण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यांनी  जम्बो व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे विदर्भातील पालकमंत्री,  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत मॅरेथॉन चर्चा करीत व्यावहारिक उपाययोजना सूचविल्या.  या व्हीसीमध्ये पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती सहभागी झाले. त्यांनी बुलडाणा जिह्याचे सादरीकरण करून विविध प्रामुख्याने ऑक्सिजन, रेमेडिसीविर तुटवडा आदी अडचणी मांडून विविध मागण्यांकडे लक्ष वेधल्याचे वरिष्ठ सूत्रांनी ‘ बुलडाणा लाईव्ह’ सोबत बोलताना सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विदर्भाला हादरविले असून, आरोग्य सुविधांसमोर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दुसऱ्या लाटेत अगदी विदर्भाच्या टोकावरच्या बुलडाणा जिल्ह्यातही ऑक्सिजन तुटवड्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे या व्हीसीमध्ये भावी संकटे लक्षात घेता नजीकच्या काळातील ऑक्सिजनची गरज, जिल्हा  व रुग्णालयनिहाय पीएसए प्राणवायू प्रकल्पांची उभारणी, ऑक्सिजन निर्मिती यावर या महाचर्चेत फोकस करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र पाठोपाठ आता अन्य राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. यामुळे त्याही राज्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनमुळे विदर्भाला होणाऱ्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, यासाठी बुलडाण्यासह सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजन बाबतीत सावध अन्‌ स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे, असे इशारेवजा प्रतिपादन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केले. त्यासाठी जिल्ह्यात रुग्णालयनिहाय पीएसए ऑक्सिजन प्रकल्पाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना देखील यावेळी करण्यात आली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: