क्राईम डायरीमुख्य बातम्या

निर्लज्जपणाचा कळस! हॉस्पिटलमधून रस्‍ता काढून कापड दुकानात ग्राहकांची एंट्री; नांदुऱ्यातील व्‍यापाऱ्याची करामत!

नांदुरा (प्रविण तायडे  ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हाभर कोरोनाने अवस्‍था बिकट केली असताना दुसरीकडे मात्र काही व्‍यापारी निर्लज्जपणाचा कळस गाठताना दिसत आहेत. कडक निर्बंधांचे पालन करण्याची सक्‍ती अवघे काही दिवस आहे. पण तेही काही व्‍यापाऱ्यांना अशक्‍य होताना दिसत असून, ग्राहकी करण्याच्‍या धडपडीतून रोज नवनव्या करामती समोर येत आहेत. नांदुऱ्यात तर एका व्यापाऱ्याने चक्‍क हॉस्पिटलमधून आपल्या दुकानात येण्यासाठी रस्‍ता बनवला. ही बाब कळताच तहसीलदार राहुल तायडे, ठाणेदार सुरेश नाईकनवरे, मुख्याधिकारी आशिष बोबडे थेट तिथे दाखल झाले. त्‍यांना दुकानात 50-60 ग्राहक दिसल्याने दुकान बंद करून दुकानमालकांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आज, 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पुष्पा ड्रेसेस हे कापड दुकान आहे. त्‍याचे मालक बाजूला असलेल्या आदिती हॉस्पिटलमधून रस्ता तयार करून दुकानात ग्राहक पाठवत होते. ही माहिती तहसीलदार व ठाणेदारांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह आदिती हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली. तेव्‍हा हॉस्पिटलमधून एक रस्ता पुष्पा ड्रेसेसमध्ये गेल्‍याचे दिसले. अधिकाऱ्यांनी दुकानात प्रवेश केला असता दुकानात मालक मोहनलाल हरगुणानी, दिनेश मोहनलाल हरगुणानी यांच्यासह 50 ते 60 ग्राहक दुकानात कापड खरेदी करताना आढळले. यावेळी तहसीलदारांनी दुकान मालकाला व ग्राहकांना बाहेर काढून दुकान बंद करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पोकाँ गजानन जायभाये यांच्या तक्रारीवरून दुकानमालक मोहनलाल हरगुणानी व दिनेश हरगुणानी यांच्या विरुद्ध साथ रोग व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: