बुलडाणा (घाटावर)

नॉन प्लॅन असले तरी गावांना जोडतात… विकास आराखड्यात हे रस्‍ते आणण्यासाठी आमदार श्वेताताई महालेंचे प्रयत्‍न सुरू; प्रस्‍ताव सादर करण्याचे आवाहन

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाणंद रक्‍ते गावागावांना जोडतात. मात्र प्लॅनमध्ये नसल्याने त्यावर शासकीय निधी खर्च करता येत नाही. चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली व बुलडाणा तालुक्यातसुद्धा हेच चित्र आहे. मात्र लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी या रस्‍त्‍यांसाठी प्रयत्‍न सुरू केले असून, अशा नॉनप्लॅन रस्त्यांचा समावेश रस्ते विकास आराखड्यात करण्यासाठी प्रत्येक गावातून ठराव देण्याचे आवाहन त्‍यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, रस्ते हे विकासाच्या धमन्या असून, ते वाहतुकी योग्य असल्यास सर्वांगीण विकासाचा पल्ला लवकर गाठता येतो. रस्त्यांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन रस्त्यांच्या सुधारणा केल्या जातात. त्यासाठी हे रस्ते शासनाच्या रस्ते विकास आराखड्यात असणे आवश्यक आहे. जे रस्ते  रस्ते विकास आराखड्यात आहेत त्याच रस्त्यांवर निधी खर्च करता येतो. या रस्त्यांना योजनेत समाविष्ट किंवा प्लॅन रस्ते असे म्हणतात. जे गाव जोड रस्ते विकास आराखड्यात  घेतलेले नाही म्हणजेच योजनेत किंवा प्लॅनमध्ये नाहीत त्या रस्त्यांना  नॉनप्लॅन किंवा योजनाबाह्य रस्ते असे म्हणतात. या नॉनप्लॅन किंवा योजनाबाह्य किंवा रस्ते विकास आराखड्यात नसलेल्या रस्त्यावर शासकीय निधी खर्च करता येत नाही. ग्रामीण भागातील गावा गावांना, वाड्या -तांड्याना जोडणारे अतिशय जवळचे फार पूर्वीपासून रस्ते आहेत. त्याला आपण पाणंद किंवा शेत रस्ते म्हणतो. गावे जवळ असूनही रस्ता खराब असल्याने नागरिकांना दूरच्या मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने शेकडो वर्षांपासून त्यांना शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची अवस्था तर अतिशय खराब आहे. त्यांच्या शेतात जाण्यासाठी त्यांना सुस्थितीत रस्ते नसल्याने बी बियाणे, खते नेण्यासाठी व शेतात पिकलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी अनंत अडचणींचा सामना दरदिवशी करावा लागतो. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या गावातील नागरिक आमचा हा रस्ता करून द्या, तो रस्ता करून घ्या, अशी मागणी घेऊन येत असतात.

माझ्या राजकीय जीवनाच्या आतापर्यंतच्या प्रवासात मला नागरिकांनी असेच रस्ते विकसित करण्यासाठी मागणी केलेली आहे. मी विधानसभेच्या अधिवेशनात चिखली व बुलडाणा तालुक्यातील गावागावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या विकासासाठी पॅकेजसुद्धा मागितलेले आहे. परंतु त्याला अद्यापही यश आले नाही. परंतु मी ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा ध्यास सोडलेला नाही. मागील वर्षी लोक सहभागातून 25 ठिकाणची पाणंद रस्ते केली. तसेच MREGS या केंद्र सरकारच्या योजनेतून ही गावागावात जाऊन रस्ते तयार करण्याचे आवाहन करत आहे . पालकमंत्री पाणंद रस्ते विकास योजनेतून 2515 व अन्य योजनेतून ही रस्ते विकास करता येईल असा प्रयत्न सुरू आहे.  चिखली विधानसभा मतदारसंघातील  रस्ते विकास आराखडा बनविण्याचे काम सुरू केलेले आहे. त्यासाठी सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी बांधवांनी दोन गावांना, वाड्या तांड्याना जोडणारे शेत रस्ते, पाणंद रस्ते यांचे नाव व अंदाजे लांबीच्या माहितीसह ग्रामपंचायत ठरावासह माझ्या सेवालय, खंडाळा रोड, तोरणा बँकेच्यावर या कार्यालयात 3 मार्च 2021 पर्यंत तीन प्रतीत सादर करावे, असे आवाहनही आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: