क्राईम डायरीमुख्य बातम्या

पती- पत्नीचा वाद म्हणून दुर्लक्ष केले; वेळीच पोलिसांत गेले असते तर वाचली असती गीता!; आई देवाघरी, बाप कारागृहात… तीन चिमुकल्या मुली उघड्यावर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सासरवाडीत येऊन पत्नीचा खून करून स्वतः दोन चिमुकल्या मुलींसह तलावात उडी घेत आत्महत्येचा आणि मुलींच्‍या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना काल, ९ ऑगस्‍टला बुलडाण्यात घडली होती. पतीला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले होते. याप्रकरणी मृतक विवाहितेचे वडील सुरेश दत्तू तायडे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, तक्रारीवरून त्‍याच्‍याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन विश्वनाथ जाधव (३०, रा. राजीव गांधीनगर, लालबाग, जालना) असे गुन्‍हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्‍याचे बुलडाणा येथील जगदंबानगर, स्मशान भूमीजवळ राहणाऱ्या सुरेश तायडे यांच्या गीता या मुलीसोबत २०११ मध्ये विवाह झाला होता. दोघांच्या संसारात त्यांना श्रद्धा ,श्रुती आणि श्रेया अशा तीन मुली झाल्या. मात्र गजानन गीताच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा व तिला मारहाण करायचा. गीताने याबाबत तिच्या आई- वडिलांना सांगितले होते. मात्र पती- पत्नीचा वाद आहे म्हणून त्यांनी आतापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. गजाननच्या संशयी वृत्तीमुळे गीता नेहमी माहेरी बुलडाणा येथे यायची. महिनाभरापूर्वी ती तिच्या मुलींना घेऊन माहेरी आलेली होती. ८ जुलै रोजी गजाननसुद्धा सासरवाडीत आला होता. रात्री त्याने सासरवाडीत मुक्काम केला.

काल सकाळी गीताचे आई आणि वडील मजुरीसाठी बाहेर गेले होते. तेव्हा गजाननने गीताशी पुन्हा भांडण केले. या वादातच त्याने चाकूने गीतावर सपासप वार केले. तिच्या पोटात आणि पाठीत चाकू खुपसला. मुलगी श्रद्धा आणि श्रुतीला घेऊन त्याने जवळच असलेल्या संगम तलावात उडी घेतली. मात्र जवळच असलेल्या लोकांनी आरडाओरड ऐकल्याने तिघांनाही वाचवले. लोकांनी गजाननला पकडून ठेवले. लगेच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. तोपर्यंत दवाखान्यात भरती केलेल्या गीताचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. गजानन गीताचा वारंवार छळ करायचा. संशय घेऊन मारहाण करायचा. ही बाब तिने वारंवार आई- वडिलांना सांगितली. मात्र तेव्हाच पोलिसांत तक्रार दिली असती तर कदाचित गीताला जीव गमवावा लागला नसता. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. संशयामुळे गजाननने पत्नीला देवाघरी पाठवले आणि तो स्वतः कारागृहात गेला. मात्र त्याच्या या कृत्यामुळे तीन चिमुरड्या मुलींचे छत्र हरवले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: