क्राईम डायरीमुख्य बातम्या

पत्‍नीला आणायले गेले अन्‌ घरी चोरट्याने केली आगळीक!!; खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बंद घर फोडून चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना खामगाव शहरातील हंसराजनगर रोडवरील नरवीर तानाजीनगरात २० जूनच्‍या सकाळी सातच्‍या सुमारास समोर आली.

विनोद रमेशलाल बेटवाल यांची पत्नी गितांजली तब्‍येत ठिक नसल्याने माहेरी औरंगाबादला पाच दिवसांपूर्वी गेली होती. तिला घरी आणण्यासाठी ते १८ जूनला औरंगाबादला गेले होते. काल सकाळी त्‍यांना त्‍यांच्या शेजारी अलकाताई मुंजाळ यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, तुमचा घराचा दरवाजा उघडा असून घरातील सामान बाहेर पटांगणात अस्ताव्यस्‍त पडलेले आहे. त्‍यामुळे बेटवाल यांनी तातडीने त्‍यांची बहीण सौ. रेश्मा परदेशी (रा. रेखा प्लाॅट, खामगाव) हिला त्‍यांच्‍या घरी पाठवले.

बहिणीने जाऊन पाहणी केली असता घराच्‍या दरवाजाचे कुलूप तोडून कुणीतरी चोरी केल्‍याचे दिसून आले. त्‍यामुळे बेटवाल पत्‍नीसह खामगावला परतले. घरातील सामानाची पाहणी केली असता कपाटात ठेवलेले ८ ग्रॅम वजनाची सोन्याची लांब पोत (किंमत २४ हजार रुपये), ५ ग्रॅम सोन्याची अंगठी (किंमत १५ हजार रुपये), ४ ग्रॅम सोन्याचे कानातील लांबट टॉप्स (किंमत १२ हजार, ६ चांदीचे पायातील जोडवे, किंमत १८००) व नगदी ३ हजार रुपये असे एकूण ५५ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेल्याचे दिसून आले. १९ जून ते २० जूनच्‍या रात्रीदरम्‍यान ही घटना घडली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: