बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी बजावले….बँकांनो, शेतकऱ्यांना उद्धट वागणूक द्याल तर खबरदार!; गतीने कर्जवाटप करा; खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : खरीप हंगाम सुरू झाला आहे. मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहे. त्यामुळे बँकांनी आता पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी. पीक कर्ज वाटपालाच प्राधान्य द्यावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली. शेतकऱ्यांना उद्धट वागणूक द्याल तर खबरदार, असेही त्‍यांनी बँकांना बजावले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज, 5 जूनला खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठक घेण्यात आली. व्यासपीठावर केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, जिल्‍हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, सभागृहात आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, आमदार राजेश एकडे, कृषी सभापती राजेंद्र पळसकर आदी उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा काही बँका शेतकऱ्यांना लाभ देत नसल्याचे समोर आले असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, की डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायी आहे. मात्र काही बँका लाभ देत नाहीत. त्यामुळे या योजनेचा लाभ दिल्या बाबतचा मागील पाच वर्षांचे रेकॉर्ड तपासण्यात यावे. यामध्ये लाभ न दिलेल्या बँकांवर कारवाई करण्यात यावी. कर्जमाफी झालेला व पात्र एकही सभासद पीक कर्जापासून वंचित राहू नये. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज वितरण करावे.

ते म्हणाले, की बँकांनी पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रांची माहिती शाखेच्या दर्शनी भागात फलकावर किंवा बॅनरवर लावावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना कागदपत्रांची माहिती होईल. कुणालाही विचारायची गरज पडणार नाही. बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करताना उद्धट वागणूक देवू नये. व्यवस्थित समजावून सांगत शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मदत करावी. खरीप हंगाम तोंडावर आलेला असून, शेतकरी खते, बीबियाणे आदी कृषी निविष्ठा खरेदीत मग्न आहे. त्यामुळे तातडीने पीक कर्ज वितरण करावे. जिल्हा बँकेमार्फत लाभ मिळालेल्या परंतु कर्ज वाटप न झालेल्या प्रत्येक सभासदाला संलग्न राष्ट्रीयीकृत बँकेने कर्जवाटप करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी उपस्‍थित आमदारांनीही पीक कर्ज वितरणाबाबत विविध प्रश्न मांडले व पीक कर्ज वितरण गतीने पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ, जिल्हा उपनिबंधक श्री. राठोड, जिल्हा बँकेचे श्री. खरात, विविध बँकांचे प्रतिनिधी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: