बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

पालकमंत्र्यांचा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात निर्धार ः कोरोनावर मात करत जिल्ह्याला बनविणार सर्वांग सुंदर!

1 लक्ष 70 हजार शेतकर्‍यांना 1121 कोटींची कर्जमुक्ती
शिव भोजन थाळीचा 5 लाखांवर लाभार्थ्यांना लाभ
गुटखामुक्त महाराष्ट्र अभियान राबविणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
ः कोरोना नावाच्या अदृश्य विषाणूने आपणाला चिंताक्रांत बनविले होते. या विषाणूचा संसर्ग थोपविण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनासोबत घेत विविध उपाययोजना राबविल्या. परिणामी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात शासनाला यश आले. कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करत जिल्ह्याला सर्वांग सुंदर जिल्हा बनविणार, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.


भारतीय प्रजासत्ताकाचा 71 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. यावेळी आमदार श्‍वेताताई महाले, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्षा कमलताई बुधवत, माजी आमदार राहुल बोंद्रे, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी श्री. गिते आदींसह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यांची उपस्थिती होती. कोरोनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून पाच दिवस दहा केंद्रावर लसीकरण सुरू असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने कोविड लस दिली जात आहे. आतापर्यंत 2500 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मागील काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत राज्य शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्ताचा तुटवडा भविष्यात निर्माण न होण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले. जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, अशा हवालदील परिस्थितीत शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत जाहीर केली. पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात प्राप्त निधीपैकी 1 लक्ष 8 हजार 503 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 48 कोटी 50 लक्ष रूपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे. राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 69 हजार 596 लाभार्थी शेतकर्‍यांना 1121 कोटी रूपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहे. यामुळे बळीराजावरील कर्जाचे ओझे निश्‍चितच उतरले आहे.


ते पुढे म्हणाले, गरीब व आर्थिक दुर्बल घटकाला नाममात्र पाच रुपये दरात दर्जेदार जेवण देण्यासाठी शिव भोजन थाळी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यात 17 केंद्रामधून 5 लक्ष 41 हजार 169 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तसेच दरमहा अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना 1 लक्ष 20 हजार क्िंवटल धान्याचे नियमित वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेमधून सन 2020-21 मध्ये आतापर्यंत 43 हजार 162 व्यक्तींना रोजगार देण्यात आला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात रोहयो अंतर्गत 811 कामे सुरू असून त्यावर 4 हजार 191 मजुरांची उपस्थिती आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात सन 2019-20 मध्ये 2 हजार 565 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत 3 हजार 963 घरकुलांचे काम मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यात जिगांवसोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघु प्रकल्पांची कामे सुरू आहे. जिगाव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यातील 22 गावांपैकी 3 गावांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले आहे. तसेच 10 गावांचे पुनर्वसन प्रगतीपथावर आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र गुटखामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले, आरोग्यासाठी घातक असणारा गुटखा अवैधरित्या राज्यातून हद्दपार करण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 आता गुटखा विक्री किंवा साठवणुकीच्या गुन्ह्यात लावता येणार आहे. जिल्ह्यात मागील कालावधीत 64 लक्ष 46 हजार रूपये किमतीच्या प्रतिबंधीत गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यात 3 लक्ष 51 हजार 917 कुटूंबांना वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येकाला दरडोई 55 लिटर पाणी मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात जल जिवन मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विविध 40 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात आले आहे. कोविडवरील लस आली असली तरी बाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क, वारंवार हात धुणे किंवा सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे ही त्रिसुत्री अंगीकारणे गरजेचे आहे. भविष्यात कोविड सारख्या साथरोगांना यशस्वीपणे रोखण्यासाठी ही त्रिसूत्री प्रत्येकाने अंगीकारावी, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांना पोलीसांकडून सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कोरोनावर मात केल्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून श्रीमती सविता तुळशीराम तायडे, श्रीमती पुष्पाताई जाधव, मिर्झा अनिस बेग मिर्झा अन्वर बेग, दशरथ हुडेकर, संजय तायडे, गणेश बिडवे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

शहीद जवानांच्या कुटूंबीयांना मदतीचे धनादेशाचे वितरण

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते आज 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस कवायत मैदानावर विविध पुरस्कार, आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 चे उत्कृष्ट निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांना स्मृतिचन्ह देण्यात आले. शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या आई वीरमाता श्रीमती जिजाबाई भिकमसिंह राजपूत, चोर पांग्रा ता. लोणार येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या वीरपत्नी श्रीमती वंदना राठोड व वीरमाता सौ. सावित्रीबाई राठोड यांना प्रत्येकी प्रति कुंटूंबीय 40 लक्ष रूपये निधीचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या वीरपत्नी किरण अनिल वाघमारे यांना 45 लक्ष रूपयांचा धनादेश देण्यात आला. शहीद जवान चंद्राकांत भाकरे यांच्या वीरपत्नी मनिषा भाकरे, वीरमाता निर्मलाबाई भाकरे व वीरपीता भगवंतराव भाकरे यांना 40 लक्ष रूपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागात खडतर व कठीण कर्तव्य बजाविल्याबाबत खामगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कोळी यांना विशेष सेवा पदक देण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव धोक्यात घालून उत्कृष्ट काम केल्याबद्दल आपत्ती निवारण अधिकारी संभाजी पवार, महसूल सहायक किसन जाधव, संजय खुळे, राजेंद्र झाडगे, पो. कॉ तारासिंग पवार, संतोष वनवे, दिपक वायाळ, रविंद्र गिते, संतोष काकड, होमगार्ड प्रविण साखरे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आल्याबद्दल खामगाव येथील श्रीमती सरोजबेन दामजीभाई विकमसी ज्ञानपीठची विद्यार्थीनी कु. तनिष्का रितेश चौधरी यांचा गौरव करण्यात आला.कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ मोहम्मद अस्लम व त्यांच्या चमूला प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महावितरणच्यावतीने सौर कृषी पंप मिळालेल्या शेतकर्‍यांना डिमांट नोट याप्रसंगी देण्यात आल्या.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: