बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवा; विनामास्क, सुरक्षित अंतर न ठेवणार्‍यांना दंड ठोठवा; होम आयसोलेशनची सुविधा बंद!; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या तीन- चार दिवसांपासून अचानक वाढले आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या हाय व लो रिस्क संपर्कातील सर्वांची कोरोना तपासणी करावी. त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, 16 फेब्रुवारीला केली.

कोरोना संसर्ग नियंत्रण कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून आरटीपीसीआर व रॅपिड चाचण्यांवर भर देण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, की पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या गावांमध्ये मोबाइल टेस्टिंग युनीट सुरू करावे. यासोबतच प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क वापरणे, हात सॅनिटाईज करणे किंवा स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या बाबींचा अवलंब करावा. जे कुणी बाहेर पडल्यानंतर मास्क लावणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाही त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस यंत्रणा दंडात्मक कारवाई करेल. तसेच शहरांमध्ये ज्या दुकानांसमोर सोशल डिस्टन्िंसग पाळले जाणार नाहीत किंवा तिथे विना मास्क ग्राहक दिसतील, अशा दुकानदारांवरसुद्धा करवाई करावी, असे ते म्हणाले.

चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाले, की एका पॉझिटिव्ह रुग्णामागे 15 हाय रिस्कमधील व 20 लो रिस्कमधील अशाप्रकारे 35 नागरिकांची तपासणी करावी. जेणेकरून कोरोना संसर्ग थांबविणे शक्य होईल. त्याचप्रमाणे सुपर स्प्रेडर असलेले दुकानदार, भाजीपाला विक्रेते तसेच ज्यांना लोक जास्त भेटतात त्यांच्या 100 टक्के तपासण्या बंधनकारकरित्या कराव्यात. अशा सुपर स्प्रेडरची महिन्यातून दोनवेळा तपासणी करावी. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशन दिले जाते. ही सुविधा बंद करण्यात यावी. कारण असे रुग्ण बाहेर फिरताना आढळतात. त्यांच्यामुळेही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आयसोलेशनची पूर्ण व्यवस्था आहे, त्यांनाच होम आयसोलेशन द्यावे. अन्यथा ही सुविधा देऊ नये. तालुका स्तरावरील यंत्रणांनी समन्वय ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे. तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तरी पॉझिटिव्ह रूग्णांना आधी कोविड केअर सेंटर येथे दाखल करावे. कोविड केअर सेंटरमधील मनुष्यबळाला कन्ट्युनेशन द्यावे. दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांची प्राधान्याने तपासणी करण्यात यावी असे आदेशही त्यांनी दिले. मलकापूर तालुक्यात पॉझिटिव्ह व मृत्यू दर जास्त आहेत. तेथील यंत्रणांनी गांभीर्याने घेत कोरोना संसर्ग रोखावा. शहरात कुठेही हॉटस्पॉट होऊ देऊ नये. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची यादी तयार ठेवून त्यांच्या कुटूंबीय, कॉन्टॅक्टमधील नागरिकांची कोरोना चाचणी करावी. अशाचप्रकारे चिखली, खामगाव आदी ठिकाणीसुद्धा कारवाई करावी, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही आवश्यक त्या सूचना दिल्या. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आदींसह संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीचे सादरीकरण अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी तर आभार माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे यांनी मानले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: