साहित्य

प्रदूषण करणारे उद्योग पाच वर्षांत दुप्पट

प्रदूषण करणार्‍या कारखान्यांविरोधात कारवाई करूनही राज्यात अशा कारखान्यांची संख्या वाढतच असून, गेल्या पाच वर्षांत जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि हानीकारक टाकाऊ पदार्थ निर्माण करणार्‍या कारखान्यांचे प्रमाण 37 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर पोहोचल्याचे धक्कादायक चित्र आहे. औद्योगिक प्रदूषण ही राज्याच्या पर्यावरणासाठी अत्यंत गंभीर बाब मानली जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही प्रदूषणासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रमुख यंत्रणा आहे. मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या अखत्यारीतील 77 हजार 746 कारखान्यांपैकी जलप्रदूषण करणारे 27 टक्के, वायूप्रदूषण करणारे 26 टक्के, तर धोकादायक टाकाऊ पदार्थ बाहेर फेकणार्‍या कारखान्यांचे प्रमाण 7 टक्के आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे नियमांच्या अंमलबजावणीसाठी अनेक कारखान्यांकडून बँक हमी घेते, तर काही प्रदूषणकारी कारखान्यांचा विद्युत आणि पाणीपुरवठा खंडित केला जातो, पण या कारवाईचा परिणाम उद्योगांवर होत नसल्याचे प्रदूषणकारी कारखान्यांच्या वाढत्या संख्येने दाखवून दिले आहे. प्रदूषण निर्माण करणार्‍या धोकादायक उद्योगांमध्ये साखर निर्मिती आणि शुद्धीकरण, हायड्रोजनेटेड तेल, वनस्पती तूप व खाद्यतेल, स्पिरीटचे शुद्धीकरण, कागद आणि कागदीबोर्ड निर्मिती, कातडी उद्योग, पेट्रोलियम आणि कोळसा, औषधी आणि रासायनिक उत्पादने, सिमेंट, धातू उद्योग आणि औष्णिक वीज प्रकल्पांचा समावेश आहे. कारखानदारांनी त्यांच्या उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रक उपाययोजना तात्काळ बसवून घेणे अपेक्षित असताना उद्योजकांकडून त्याकडे डोळेझाक केली जात आहे. उद्योगांनी सांडपाणी विसर्जित करताना सांडपाण्याची गुणवत्ता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर तीन महिन्याला तपासून प्रदूषण होत नसल्याचे प्रमाणपत्र जलसंपदा विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रदूषण करणार्‍या कारखान्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण उत्पादन क्षेत्रातील आहे. सुमारे 50 टक्के कामगारांना या प्रदूषणकारी कारखान्यांमध्ये काम करावे लागते. त्यांच्या आरोग्याची चिंता करणारे कुणी नाही. प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करणे विविध यंत्रणांकडून अपेक्षित असताना केवळ कागदोपत्री कारवाईमुळे उद्योजकांचे फावले आहे. वायू प्रदूषणाने भारतात घेतला 1 लाख चिमुकल्यांचा बळी वाढते वायू प्रदूषण आणि विषारी हवेमुळे भारतात वर्षभरात तब्बल 1 लाख 10 हजार लहान मुलांचा हकनाक बळी गेल्याचे जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचा या निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी 20 लाख लोक मृत्यूमुखी पडतात. त्यात लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतात 2.5 पीएमच्या प्रदूषणामुळे मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. भारताच्या खालोखाल नायजेरियामध्ये दरवर्षी 47 हजार लहान मुलं वायू प्रदूषणाचे बळी ठरतात. भारतात मृतांमध्ये मुलींचं प्रमाणही भरपूर आहे. एकूण 32 हजार मुली वायू प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडल्या. जगातील वायू प्रदूषणाचे 25 टक्के बळी हे भारतातच जातात. तेव्हा येत्या काळात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी भारताने प्रयत्न करायला हवेत असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

– अमोल काळे, पर्यावरणत तज्ज्ञ

 
 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: