क्राईम डायरीमुख्य बातम्या

फेसबुकवरून झालेल्या लव्‍हस्‍टोरीचा ‘घात’क प्रवास… वारंवार बलात्‍कार, लग्‍नाचे आमिष अन्‌ पुन्‍हा घातच नशिबी!!; अंभोडाचा तो अन्‌ अमरावतीची ती…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः फेसबुकवरून त्‍यांची ओळख झाली… चॅटिंग वाढले, प्रेम झाले… फेसबुकवरून कॉलवर आले… प्रेम आणखी वाढले… साथ जियेंगे, साथ मरेंगेच्‍या शपथा घेतल्या… प्रेम इतकं ओसंडून वाहिलं की दोघांनी शेगावमध्ये जाऊन परस्परही लग्‍नही उरकले… मात्र हे लग्‍न त्‍यानं समोर येऊच दिलं नाही… घरी घेऊन चल म्‍हटलं की तो टाळायचा… एक दिवस त्‍याने चक्‍क मोबाइलच बंद केला… तिचा संपर्क तुटला… ती कावरीबावरी झाली… ज्‍याच्‍यावर विश्वास टाकून सर्वस्‍व सोपवलं, त्‍यानंच घात केला होता. तिनं पोलिसांची मदत घेण्याचं ठरवलं… त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला, न्‍यायालयात खटला उभा राहिला… कुठंतरी न्याय मिळेल अशी आशा तिला होती… पण त्‍याच्‍या डोक्‍यातलं कारस्‍थान शमलं नव्‍हतं… तिला पुन्‍हा प्रेमाच्‍या आशेचा किरण दाखवून गावात आणलं गेलं… पुन्‍हा तिच्‍यावर बलात्‍कार झाला, त्‍यानंतर रात्रीतून कुठेतरी गायब करण्याचा प्‍लॅन होता, पण मध्येच गाडी बंद पडली.. अन्‌ तिने संधी साधून तिथून पळ काढला. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठलं…. काल, 21 एप्रिलच्‍या रात्री उशिरापर्यंतचा हा घटनाक्रम धक्‍कादायक अन्‌ विकृतीचा कळसच म्‍हणावा.

या घटनेबद्दल पोलीस सूत्रांनी सांगितले, की 24 वर्षीय कल्याणी (काल्पनिक नाव) ही अमरावती येथील आहे. 2016 मध्ये तिची सोहमशी (29) (काल्पनिक नाव) रा. अंभोडा, ता. बुलडाणा फेसबुकवरून मैत्री झाली. सोहम सीमा सुरक्षा दलाचा जवान आहे. फेसबुकवर चॅटिंग करताना दोघांतील मैत्री फुलली. दोघे कॉलवर आले. त्‍यातून प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर दोघांत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्‍थापित झाले. 2018 मध्ये दोघांनी शेगाव येथे लग्‍न केले. मात्र या लग्‍नाची कल्पना घरच्यांना देण्यात आली नव्हती. त्यानंतर कल्याणीने सोहमकडे त्याच्‍या गावी घेऊन जाण्याचा आग्रह केला. मात्र सोहम  जातीचे कारण देऊन घरचे तुला स्वीकारणार नाहीत म्हणून टाळाटाळ करत राहिला. एक दिवस त्‍याने त्‍याचा चक्‍क मोबाइल बंद केल्याने ती हादरून गेली. त्याच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याने हवालदील झाली. फसवणूक झाल्याचे तिच्‍या फार उशिरा लक्षात आले होते. तिने या विरोधात न्‍याय मिळण्यासाठी मे 2020 मध्ये अमरावतीच्‍या राजपेठ पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. त्यानंतर हा गुन्हा शेगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

खामगावच्या न्यायालयात खटला उभा राहिला. 17 एप्रिल 2021 रोजी सोहमच्या भाऊजीने कल्याणीला फोन करून प्रकरण आपसात मिटवून टाकू. तुझे लग्न सोहमसोबत लावून देतो, असे म्हणत खामगावला यायला सांगितले. 20 एप्रिलला ती खामगावला आली. तेव्हा सोहम, त्याचे वडील, भाऊजी आणि आणखी एक अनोळखी व्‍यक्‍तीने तिला गोडगोड बोलून गाडीत बसवले. रात्रीच तिला अंभोडा येथे आणण्यात आले. सोहमच्या घरी गेल्यानंतर घरातील महिला कल्याणीच्या अंगावर धावून आल्या. त्यानंतर सोहमने कल्याणीला बेडरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच हे कारस्‍थान थांबले नाही. कदाचित सोहमच्‍या डोक्‍यात वेगळेच काहीतरी शिजत असावे. त्‍याने भाऊजीच्‍या मदतीने तिला शेतात नेण्याचा प्‍लॅन केला. मात्र मध्येच गाडी बंद पडली. गाडी दुरुस्त करण्यासाठी दोघे उरतले असता कल्याणीने संधी साधू रात्री उशिरा पळ काढला. सकाळीच तिने थेट बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात 9 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, त्‍यात 5 महिलांनाही आरोपी करण्यात आले आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार सारंग नवलकार यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक एकनाथ बावस्‍कर, नापोकाँ संदीप पाटील करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: