बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

‘बर्ड फ्ल्यू’मुळे यंत्रणा जिल्ह्याची यंत्रणा ‘हाय अलर्ट मोड’वर!; पोल्ट्री व कत्तलखाने रडारवर

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विविध राज्यामध्ये ‘फिर वही दिल (रोग) लाया हूँ या धर्तीवर देशात परतलेल्या बर्ड फ्लूच्या उद्रेकावरून मोठ्या संख्येत पशुधन असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पशुसंवर्धन व अन्य यंत्रणांना हाय अलर्ट करण्यात आले आहे. यासाठी ४ विभागांना वन हेल्थ संकल्पनेनुसार काम करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांना प्रामुख्याने पोल्ट्री फार्म व कत्तलखाने यांच्यावर करडी नजर ठेवून दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरात, मध्यप्रदेश यासह दूरवरच्या केरळ, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाणा आदी राज्यांत बर्ड फ्लूने एन्ट्री केली आहे. त्या ठिकाणी कोंबड्या, बदक, कावळे व स्थलांतरित पक्ष्यांना या रोगाची लागण झाल्याचे दिसून आले. यामुळे कृषिप्रधान व लाखोंच्या संख्येत पशुधन, प्रामुख्याने पोल्ट्री फार्ममधील ब्रॉयलर व गावरान कोंबड्या असलेल्या जिल्ह्यावरही या रोगाचे सावट पसरले आहे. यामुळे जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. पुणे स्थित आरोग्य संचालनालयाने दिलेल्या आदेशानुसार इन्फ्लुएन्झा सदृश्य रोगांचे सर्वेक्षण अधिकच सतर्कतेने करण्यात येत आहे. तसेच बर्ड फ्लूचा नियमित अहवाल पाठविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने पोल्ट्री फार्म, कत्तलखाने, पशूंच्या सहवासात राहणारे लोक यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अनेक प्राणिजन्य आजार माणसामध्येही आढळत असल्याने संशयित नमुने थेट राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आल्याने या संभाव्य धोक्याची कल्पना येते. यावर कळस म्हणजे बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन सह कृषी, सार्वजनिक आरोग्य व वन हे विभाग समन्वयाने काम करत असून प्राणिजन्य आजारांवर (झुनोसिस) समन्वयाने काम करण्यात येत आहे. संभाव्य आणीबाणीसाठी शीघ्र प्रतिसाद दलामध्ये पशु तज्ज्ञांचा समावेश करण्याचे व जिल्हा झुनॉटिक समितीच्या बैठकीत जिल्हा कृती योजना तयार करण्याचे नियोजन आहे.
जिल्हावासीयांनो अशी घ्या काळजी…
१०० डिग्री सेल्सियसवर शिजवलेले मांसच खा, कच्चे चिकन व उत्पादनाचे काम करत असताना मास्क व ग्लोजचा वापर करावा आणि पाणी व साबणाने हात वारंवार धुवावे. कच्चे, अर्धवट शिजविलेले चिकन व अंडी खाऊ नये. आजारी व सुस्त पक्ष्यांपासून दूर राहावे, कोंबड्या, पक्ष्यांचे पिंजरे, ज्या भांड्यात त्यांना खाद्य पाणी दिले जाते अशी भांडी रोज पावडरने धुवावी. मेलेल्या पक्ष्यास उघड्या हाताने स्पर्श न करता जिल्हा नियंत्रण कक्षास तात्काळ कळवा. पक्षी स्त्रावासोबत संपर्क टाळा.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: