क्राईम डायरी

बहिणीला व्‍हॉट्‌स ॲप मेसेज केल्यावरून चाकूने भोसकणारे दोघे न्‍यायालयीन कोठडीत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बहिणीला व्‍हॉट्‌सॲपवर मेसेज केल्याच्‍या कारणावरून शिरपूरमध्ये (ता. बुलडाणा) युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ऋषीकेश मधुकर हिवाळे हा या हल्ल्यात गंभीर जखमी आहे. गणेश रमेश शेळके (23) व वैभव काशीनाथ शेळके (21, रा. शिरपूर) या दोघांना 12 जूनला अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. आज, 14 जूनला दोघांना बुलडाणा न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गंभीर जखमी ऋषिकेशला अकोला येथे हलविण्यात आले होते. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

11 जूनला रात्री 9:30 वाजता ऋषीकेश घरासमोर उभा होता. त्यावेळी गणेश व वैभव त्याला गाडीवर घेऊन गेले. ऋषीकेशच्‍या आईला त्‍यांनी 10 मिनिटांत परत येत असल्याचे सांगितले होते. रात्री साडेदहाच्‍या सुमारास शुभम राजू हिवाळे व शुभम गजानन हिवाळे हे ऋषीकेशला गंभीर जखमी अवस्थेत घरी घेऊन आले. त्याला पोटाला व पायाला मार लागला होता. याबद्दल ऋषीकेशला विचारणा केली असता त्याने गणेश व वैभवने हल्ला केल्याचे सांगितले. गणेश व वैभव यांनी त्याला मोटारसायकलवर पांगरी रोडवर नेले. तिथे वैभवच्‍या चुलत बहिणीला मेसेज का पाठविला असे म्‍हणून दोघांनी ऋषीकेशला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. गणेशने ऋषीकेशच्या बरगडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ऋषीकेशच्या वडिलांनी त्याला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला अकोला येथे रेफर केले होते. याप्रकरणी 12 जूनला रायपूर पोलीस ठाण्यात ऋषीकेशचे वडील मधुकर शिवराम हिवाळे (48, रा. शिरपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश व वैभव (21) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: