क्राईम डायरीमुख्य बातम्या

बाप्पा, अख्खा आयशर भरून गुटखा आला खामगावात!; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, खामगाव शहर पोलिसांची कामगिरी

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः  अख्खा आयशर भरून गुटखा खामगावमध्ये दाखल झाला. पण पोलिसांना सुगावा लागला अन्‌ बिंग फुटले. खामगाव शहर पोलिसांनी गौतम चौकात हा आयशर पकडला. त्याची तपासणी केली असता त्यांनाही धक्काच बसला. ही कारवाई आज, 28 मे रोजी करण्यात आली.

गणेश रामहार भोई (40, रा. शहापूर, जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आयशरचालकाचे नाव आहे. भुसावळ चौकातून गौतम चौकाकडे लाल आयशर गुटखा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे वेळ न दवडता तातडीने गौतम चौकात सापळा लावण्यात आला. आयशर दिसताच त्याला थांबवून तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात प्रिमियम राजनिवास पानमसाला नावाची 11390 पाकिटे एकूण किंमत 13 लाख 66 हजार 800 रुपये तसेच प्रिमियम एन पी 01 जाफरानी जर्दा सुगंधित तंबाखूची 11390 पाकिटे एकूण किंमत 3 लाख 41 हजार 700 रुपये आढळली. या मालासह आयशर (क्रमांक एमएच 19 झेड 4279) किंमत 8 लाख रुपये असा एकूण 25 लाख 8 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही धडाकेबाज कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनील अंबुलकर, पोलीस उपनिरिक्षक गौरव सराग, सम्राट ब्राह्मणे, पोहेकाँ अरुण हेलोडे, गजानन बोरसे, नापोकाँ सूरज राठोड, संतोष वाघ, पोकाँ दीपक राठोड, प्रफुल्ल टेकाळे, जितेश हिवाळे, अमरदीपसिंह ठाकूर, अनंता डुकरे यांनी केली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: