कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बाप रे! केवळ 20 दिवसांतच 7695 पॉझिटिव्ह!! बुलडाण्याची महानगराशी बरोबरी, लवकरच कडक निर्णयाची चिन्हे दिसू लागली

बुलडाणा( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मर्यादित लॉकडाऊन लावला, कर्फ्यू लागू केला, 13 तालुकास्थळे कंटेन्मेंट झोन घोषित केलीत; पण कोरोना जिल्ह्यात सन 2021 मध्येही ठाण मांडून बसल्याचे, नव्हे तो सामूहिक संसर्ग (सोशल स्प्रेडिंग) प्रमाणे फैलावत आहे. प्रारंभी घाटावरील तालुक्यांत व शहरी भागात बस्तान बसविल्यावर आता कोरोनाने घाटाखाली व ग्रामीण भागातही आपले हातपाय पसरविल्याचे गंभीर चित्र आहे.

होय! जिल्ह्यातील कोरोना संसर्ग, पॉझिटिव्हचे आकडे, पॉझिटिव्हीटी रेट सर्वच काही धोक्याची पातळी ओलांडलेल्या मोठ्या नदीच्या पुरासारखीच झाली आहे. 21 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन व कर्फ्यू लागू करण्यात आला. 13 तालुक्यांची ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. दुकानाच्या वेळा कमी करण्यात आल्या. आठवडी बाजार बंद, शाळा- कॉलेज बंद, सर्व समारंभ, उत्सव बंद, लग्ने मर्यादित झालीत. कार्यालयात 50 टक्के वा कमी उपस्थिती, दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला. शुक्रवार वा शनिवारपासून जनता कर्फ्यूचा फॉर्म्युला वापरून झाला. सर्व सार्वजनिक व्यवहार कमी, संचार कमी, सर्व काही कमी , मात्र सर्व उपाय योजना करूनही कमी झाला नाही तो कोरोना.

पॉझिटिव्ह रुग्ण, वाजत गाजत कडक निर्बंध लागू झाल्याचा मुहूर्त अर्थात 21 ते 28  फेब्रुवारी दरम्यानच्या केवळ 8 दिवसांच्या कालावधीत किती रुग्ण निघावे?  शेकडो नव्हे , तब्बल 2823 ! मार्च महिन्यात कोरोनाचा हा भीषण प्रकोप नुसताच कायम राहिला नाही तर त्यात भरमसाठ वाढ झाली. 1 ते 11 मार्च दरम्यान तब्बल 4872 रुग्ण निघाले. यामुळे 21 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान 7 हजार 695 पॉझिटिव्ह आढळून आलेत.

20 दिवसांत 33 टक्के रुग्ण!

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार गत्‌ मार्च 2020 ते 10 मार्च 2021 दरम्यान 23540 रुग्ण आढळलेत. यापैकी तब्बल 7695 वरील 20 दिवसांत निघाले आहेत. एकूण  रुग्णाच्या तुलनेत ही टक्केवारी 33 टक्के इतकी आहे. यामुळे प्रशासन लवकरच कडक निर्णय घेण्याची चिन्हे आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: