क्राईम डायरीमुख्य बातम्या

बाबो, डॉक्‍टर तुम्‍हीसुद्धा फसले… एक फोन आला अन्‌ डॉक्‍टर गळाला अडकले!; खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बँकेचा कर्मचारी किंवा अन्य कुणालाही तुमच्‍या मोबाइलवर येणारा ओटीपी, एटीएम किंवा क्रेडिट कार्डवरील सीव्‍हीव्‍ही कुणालाही सांगू नका, असे बँका सांगून सांगून थकल्या, पोलीस आवाहन करू करू थकले पण फसणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. कमी शिकलेल्यांना फसवणे भामट्यांना सोपे जातही असेल, पण उच्‍चशिक्षितही जेव्‍हा अशा भामट्यांच्‍या गळाला लागतात तेव्‍हा आश्चर्य व्‍यक्‍त झाल्यावाचून राहत नाही. खामगावमधील एका डॉक्‍टरांना चक्‍क भामट्याने 55 हजारांना गंडवले आहे. डॉक्‍टरांनी मोबाइलवर आलेला ओटीपी सांगितला आणि फसले.
डॉ. शिवाजी अशोक म्‍हैसने (36, रा. तंत्रनगर, खामगाव) असे या डॉक्‍टरांचे नाव आहे. त्‍यांना 13 एप्रिलपूर्वी मोबाइलवर कॉल आला. त्‍यांनी काॅल उचलताच समोरून बोलणाऱ्याने, मी स्‍टेट बँक शाखा पुणे येथून मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले व क्रेडिट कार्डचा नंबर मागितला. डॉक्‍टरांनी नंबर दिलाही. त्‍यानंतर भामट्याने क्रेडिट कार्डचे पॉईंट वाढविण्यासाठी मोबाइलवर आलेला ओटीपी मागितला. झालं डॉक्‍टर इथेच फसले. त्‍यांच्‍या खात्‍यातून भामट्याने तब्‍बल 55 हजार 600 रुपये ऑनलाइन काढून घेतले. आपण भामट्याच्‍या गळाला लागल्याचे लक्षात येताच डॉक्‍टरांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता पोलीस तपास करत आहेत.
बुलडाणा लाइव्‍हचे आवाहन…
शेतकरी, सामान्‍य नागरिकांना अनेकदा असे फोन येत असतात. त्‍यांना तुमचे कार्ड खराब झाले, बँकेकडून अमूक अमूक ऑफर आहे अशा प्रकारचे फोन बँकेतून बोलत असल्याचे सांगून येत असतात. एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती मागतात किंवा बँक खात्‍याचे डिटेल्‍स मागतात. पण ग्राहकांनी आपली कोणतीच माहिती देऊ नये. बँकेत गेले तरी एटीएम कार्ड कुणाच्‍या ताब्‍यात द्यायचे नसते की मोबाइलवर आलेला ओटीपी कुणाला द्यायचा नसतो. मग फोनवर असा विश्वास ठेवून स्‍वतःच्‍या पायावर कुऱ्हाड का मारून घ्यावी? बँकेत किंवा असे कॉलवर कधीच आपल्या खात्‍याची किंवा एटीएम कार्ड, मोबाइलवर आलेल्या ओटीपीची माहिती कुणालाही देऊ नये,असे आवाहन आम्‍ही बुलडाणा लाइव्‍हच्‍या वतीने करत आहोत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: