बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बुलडाणा लाइव्ह एक्सक्लुझिव्ह ः आजवर 50 हजार कोरोना स्वॅब तपासण्याचा विक्रम!!; आरटीपीसीआर लॅबची कमाल; 12 तास चालते लॅब, रोज 500 वर स्वॅबची टेस्टिंग!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ/अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दीर्घ प्रतीक्षेनंतर, चिखलीच्या आमदार श्‍वेताताई महाले यांच्या आक्रमक पवित्र्यासह लोकप्रतिनिधींनी वारंवार केलेल्या मागण्यांमुळे बुलडाणा शहरात थाटामाटात कोरोना स्वॅब टेस्टिंग लॅब 24 सप्टेंबर 2020 ला सुरू झाली. या लॅबने उशिरा सुरू होऊन का होईना पण अल्पावधीत धडाकेबाज कामगिरी करत गेल्या तीन-साडेतीन महिन्यांत तब्बल 50 हजार स्वॅब तपासले असून, आता स्वॅब येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही 500 ते 600 स्वॅब तपासले जात आहेत. 12 तास दोन शिफ्टमध्ये लॅबचे काम चालते. 26 कंत्राटी कर्मचार्‍यांवर लॅबचा भार आहे.

जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने पूर्वी तपासणीसाठी अकोला, अमरावती, यवतमाळ तर कधी नागपूर येथे पाठवावे लागत होते. तेथून त्यांचे तपासणी अहवाल यायला चार ते पाच दिवस लागत होते. त्यामुळे जिल्ह्यातच लॅब असावी यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे प्रयत्न सुरू केले होते. आमदार श्‍वेताताई महाले यांनी या प्रश्‍नी वारंवार निवेदने देत, आक्रमक पवित्रा घेतला होता. लॅबमध्ये सुरुवातीला रोज 60 स्वॅब नमुने तपासण्यात येत होते. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन हजार ते 1600 पर्यंत गेली होती. सध्या 500 ते 600 नमुने तपासण्यात येतात. जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे स्वॅब नमुने जिल्ह्यातच तपासणी होत असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावावर देखील यामुळे नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे दिसून आले.

26 कंत्राटी कर्मचार्‍यांवर भार…

26 कंत्राटी कर्मचार्‍यांवर या लॅबचा भार आहे. ते जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढण्यात मोठी मदत करत आहेत. सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 8 अशा दोन शिफ्टमध्ये नमुने तपासणीचे काम चालते. दूरच्या तालुक्यातील नमुने पोहोचण्यासाठी वेळ लागतो म्हणून रात्री उशिरा आलेले नमुने स्वीकारण्यासाठी सुद्धा दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवसाला येतात 500 ते 600 सॅम्पल सध्या या लॅबमध्ये दिवसाला 500 ते 600 नमुने तपासणीसाठी येतात. सुरुवातीच्या काळात दिवसाला 1000 ते 1600 नमुने तपासणीसाठी यायचे आता मात्र त्यात घट झाल्याचे सांगण्यात आले. नमुने लॅबमध्ये आल्यापासून तर त्याचा रिझल्ट येण्यापर्यंतच्या प्रकियेला 7 ते 8 तासांचा कालावधी लागत असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून…

स्वॅब तपासणार्‍या कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. लॅबमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पायातील पादत्राणे बाहेर काढावी लागतात. लॅबमध्ये वापरण्यासाठी सर्व कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र चपलांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय सॅनिटायझर, पीपीई किट, हॅन्डग्लोजची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. नोकरीवरून घरी गेल्यानंतर अंघोळ करूनच घरात प्रवेश करावा लागतो.

समाजाचा कृतघ्नपणा…

कोरोना संकटकाळात अनेकांनी आपल्या सेवा देणे बंद केले होते. त्या काळात या कठीण कामासाठी आम्ही जीवावर उदार होऊन कंत्राटी कर्मचारी म्हणून या कामासाठी वाहून घेतले. लॅबमध्ये काम करतो म्हणून अनेक अडचणी आल्या. शहरात खोली करून राहण्यासाठी खोली मालकांकडे गेल्यावर त्यांनी खोली देण्यास नकार दिल्याचे एका कर्मचार्‍याने सांगितले. गल्लीतील लोक सुद्धा आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे.

वेतन थकले…

या काळात सरकारने तुटपुंज्या पगारावर नेमणूक केली; परंतु ते पगारही वेळेवर दिले नाहीत. सध्या अडीच महिन्यांचे वेतन थकल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. सध्या कोरोनाचा कहर कमी होत असल्याने अनेक ठिकाणच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात येत आहे. काही ठिकाणच्या लॅबही सरकारने बंद केल्या आहेत. कोरोना संकटकाळात आम्ही सेवा दिली. आता कोरोनानंतर आमचे भविष्य काय? असा प्रश्‍नही कर्मचार्‍यांनी उपस्थित केला. कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून तर खासदार ,आमदार जिल्हाधिकार्‍यांना निवेदने दिलीत परंतु त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची खंत कर्मचार्‍यांनी बोलताना व्यक्त केली.

हे आहेत कोविड योद्धे…

नोडल ऑफिसर डॉ. प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात डॉ. पल्लवी वाघमारे आणि डॉ. अजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली लॅब टेक्निशियन प्रवीण वाकोडे, श्रद्धा लांडगे, वैभव तावरे, ज्ञानेश्‍वर खांडेभराड, शीतल इंगळे, अशोक मुंडे, चेतन एकडे, महेश मेहेत्रे, अमोल सालोक, सचिन राठोड, वैभव जाधव, नीलेश इंगोले, दीपक सुसर, गजानन बोरखडे, भारत सुरडकर, शेख जहीर शेख जब्बार, शेख सलमान शेख बाबर, शेख वसिम शेख अहेमद, प्रवीण चव्हाण, प्रतीक साळोख, प्रथमेश सिरसाट, सोपान शिंदे, अविनाश हिवरे, मनीषा गायकवाड यांच्या खांद्यावर या लॅबची जबाबदारी आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: