बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बेजबाबदार नागरिक वठणीवर!! ५ पथकांची बुलडाण्यात करडी नजर, 90 टक्‍के नागरिक मास्‍कशिवाय बाहेर पडेनात!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईला व्यापक रूप देण्यात आले असून, शिवजयंतीच्या मुहूर्तावर शहरभरात 5 पथके तैनात करण्यात आली आहे. त्‍यामुळे दंडाच्या भीतीपोटी का होईना आता 90 टक्के बुलडाणेकर मास्क घालून सोशल डिस्‍टन्‍सिंगचे पालन करत असल्याचे सुखद चित्र आहे.
17 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व आरडीसी दिनेश गीते यांनी वाढत्या कोरोना प्रकोपावर आढावा बैठक घेतली. यानंतर संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच विविध उपाययोजना लागू करण्यात येऊन नगर परिषदांना पोलिसांच्या मदतीने नव्याने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. बुलडाणा पालिकेने 18 फेब्रुवारीच्या सकाळपासूनच कारवाई सुरू केली. स्वतः जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी हे पथकांच्या भेटी घेऊन निरीक्षण करीत असल्याने कर्मचाऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. 19 फेब्रुवारीपासून 5 पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रकाश केसकर, शुभम मेश्राम, गजानन बदरखे, आशिष फोकाटे, राजेश भालेराव हे प्रमुख असलेल्या या पथकांत प्रत्येकी 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 5 पथकांना विविध परिसर ठरवून देण्यात आले आहेत. पहिल्या पथकाकडे मलकापूर रोड, डॉल्फिन स्विमिंग पूल ते जयस्तंभ चौक, स्टेट बँक मुख्यालय, दुसऱ्या पथकाकडे जांभरून रोड, बस स्टँड परिसर ते संगम चौक, तिसऱ्या पथकाकडे चिखली रोड, बोथा खामगाव रोड , त्रिशरण चौक, चौथ्या पथकाकडे चिंचोले चौक, धाड रोड, नाका ते सर्क्युलर रोड आणि अतिक्रमण पथकाकडे जनता चौक, बाजारपेठ, मार्केट लाईन ते कारंजा चौक असा भाग देण्यात आला आहे. प्रशासन अधिकारी संजय जाधव व एकनाथ गोरे यांच्यावर समन्वयाची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.
या पथकांनी दंडाचा धडाका लावल्याने व पोलिसांनी देखील याचा सपाटा लावल्याने वाहनधारक ते पादचारी, दुकानदार निर्देशांचे पालन करीत असल्याचे दिसून येते. 17 फेब्रुवारी पर्यंत 10 टक्केच नागरिक मास्क घालत असल्याचे चित्र होते. मात्र परत कारवाईची धडक मोहीम सुरू झाल्याने मास्क घालणाऱ्यांची संख्या 90 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली असल्याचे सुखद चित्र आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधाला सहकार्य होत आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: