बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बैलगाडी मोर्चाने प्रशासन हादरले!, बुलडाणा शहर दणाणले!!; …तर हजारो बैलांसह मंत्रालयात घुसू, रविकांत तुपकरांसह सव्वाशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्रात बंद असलेली बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी. खिल्लार गोवंश वाचविण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आज, ११ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. नेते रविकांत तुपकर यांनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. जमावबंदीचे व कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे श्री. तुपकर यांच्यासह जवळपास सव्वाशे जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

शेतकऱ्याला बैल व बैलजोडी खरेदीसाठी अनुदान देण्यात यावे. संविधानातील कलम ४८ प्रमाणे राज्य सरकारने वन्य प्राणी, पक्षी याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या जुंपणीच्या जनावरांची यादी जाहीर करण्यात यावी. संविधानातील कलम ४८ प्रमाणे जुंपणीच्या जनावरांच्या वंशवृध्दीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून शासनमान्य प्रदर्शन भरवावे. जुंपणीच्या जनावरांच्या यादीत असणारा बैल असेल तर त्याला गाडी ओढणे, पोहणे तसेच इतर मेहनतीची कामे करण्यास परवानगी असावी. बैल, गाय, वासरे यांना कत्तलखान्यात कापण्याची परवानगी देऊ नये. असे कोठे आढळल्यास दोषींवर कारवाई करावी.

बैलाची शारीरिक क्षमता सिद्ध करून तो पळू शकतो याचे परीक्षण करून अहवाल तयार करण्यात यावा यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मोर्चाची सुरुवात रविकांत तुपकर यांच्‍या सोसायटी पेट्रोलपंपासमोरील जनसंपर्क कार्यालयापासून करण्यात आली. बैलगाडी, डफडे व आसपासच्या गावातील अनेक बैलगाडी चालक- मालक मोर्चात सहभागी झाले होते. हो मोर्चा चिखली रोडने सोसायटी पेट्रोलपंप चौक, त्रिशरण चौक, मोठी देवी, शहर पोलीस ठाणे, एडेड चौक, तहसील चौक, स्टेट बँक चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी डफडे वाजवत, घोषणाबाजी करत, जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला होता. श्री. तुपकर याच्यासह, जि. प. सदस्य शरद हाडे, विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन, पवन देशमुख, शब्बीर सेठ, राजू वाळके, सुखदेव गाडे, सतीश दांदडे, मनोज देशमुख, विजय नरोटे यांच्यासह अनेक बैलगाडी चालक- मालक मोर्चात सहभागी झाले होते.

सव्वाशे जणांविरुद्ध गुन्हे
कोरोना रुग्णसंख्या जिल्ह्यात कमी असली तरी पूर्णपणे कोरोना संपला नाही. सुरक्षित अंतराचा फज्जा उडवला म्हणून व कोविडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले म्हणून रविकांत तुपकर यांच्यासह सव्वाशे जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक अभिजित अहिरराव यांनी याप्रकरणी तक्रार दिली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: