बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

ब्रेकिंग! जिल्ह्यातील ‘ते’ 97 अधिकारी उद्या सामूहिक रजेवर!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला व आरोपींविरुद्ध कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी एकवटले असून, ते उद्या 2 फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. यात तहसीलदार, नायब तहसीलदार सहभागी होणार आहेत. उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांनी सुद्धा आंदोलनात उडी घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 97 अधिकारी रजेवर जाणार असल्याने महसूलचे कामकाज ठप्प होणार आहे.
नायब तहसीलदार पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर मागील 23 जानेवारीला रेतीमाफिया व त्याच्या टोळक्याने चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर 24 जानेवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. यामुळे महसूल अधिकार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हल्लेखोरांविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना आक्रमक झाली आहेत. तसेच एसडीओ संवर्गातील अधिकारी देखील पुढे सरसावले आहेत. यामुळे नुकतेच सुरेश बगळे, श्री. खडसे, श्री. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले. त्यानुसार 2 फेब्रुवारीला उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांसह 12 उपजिल्हाधिकारी, 21 तहसीलदार, 64 नायब तहसीलदार मिळून 97 अधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. परिणामी जिल्ह्यातील महसूल विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: