बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

भाजपचे हरवले कोरोना भान!; दाटीवाटीने उभे राहून आंदोलन, नियम फक्‍त सामान्‍यांनाच का? बुलडाणेकरांची नाराजी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना वाढण्यास राज्‍य शासनाला जबाबदार धरणारे भाजपा पदाधिकारी कोरोनाबद्दल स्‍वतः किती खबरदारी घेतात, याचे दर्शन बुलडाणेकरांना आज, 21 मार्चला झाले. कोणत्‍याही प्रकारचे सुरक्षित अंतर न ठेवता गर्दी करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍या राजीनाम्‍यासाठी जयस्‍तंभ चौकात निदर्शने केली. तत्‍पूर्वी रॅलीही काढली. कोरोनाविषयक नियम केवळ सामान्‍यांनाच आहेत का, राजकीय पदाधिकाऱ्यांना कधी लागू होऊन कारवाई होणार, असा सवाल बुलडाणेकरांत व्‍यक्‍त होत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रातून केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना बुलडाणा शहरात भारतीय जनता पक्षाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जयस्तंभ चौकात जोरदार घोषणा देत निदर्शने  केली. माजी कामगार मंत्री तथा आमदार डॉ.संजय कुटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. संगमचौकातून जयस्तंभ चौकापर्यंत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. जयस्तंभ चौकात भाजप कार्यकर्त्यांनी रिंगण करून काही वेळ रस्ता अडवून धरला होता. या निदर्शनामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, आमदार श्वेताताई महाले, दत्ता पाटील, डॉ. राजेश्वर उबरहंडे, सचिन देशमुख, सिंधू खेडेकर, दीपक वारे, अर्जुन दांडगे, पुरुषोत्तम लखोटिया, विठ्ठल येवले,  सिद्धार्थ शर्मा, अरविंद होंडे, मंदार बाहेकर, नितीन बेंडवाल, सुनील देशमुख, पंडित देशमुख, नंदानी साळवे, दशरथ सिंग राजपूत, विनायक भाग्यवंत, गणेश देहाडराय, बंडू पाटील, किरण नाईक, प्रकाश पाटील, संजू पांडव,  विरेंद्र वानखडे, सिंधू तायडे, कांता राजगुरे, कुशवर्ता पवार, माया पद्माने, कल्पना आव्हाड, शोभा ढवळे, प्रतिभा मानकर, मनीषा सपकाळ,  किरण उमल, अलका पठक यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

लोकशाहीत आंदोलन, सत्ताधाऱ्यांना विरोध, आरोप हे ठीक, राजकीय अंतर पाळणे ठीक ,पण सामाजिक भान, बांधिलकी ठेवून सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक होते. मात्र याकडे शिस्तबद्ध म्‍हणवल्या जाणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी  साफ दुर्लक्ष केले, ही बाब बुलडाणेकरांना खटकली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: