जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

भादोल्यातील अजब इलक्शन… अपक्ष झाला सरपंच अन्‌ अल्पमतांवाले सत्ताधारी!

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नजीकच्या किंबहुना लवकरच बुलडाण्याचे उपनगर होऊ घातलेले भादोला हे गाव अफलातून असेच म्हणावं. या गावचे राजकारण बी असंच. नुकत्‍याच पार पडलेल्या 11 सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीत या हटके पद्धतीने वागणाऱ्या गावाच्या इरसाल राजकारणाचा पुन्हा नव्याने प्रत्यय आला. यंदा गावात 2 पॅनल एकमेकांविरोधात जोमानं भिडले. पॅनलच्या लढाईत एका नवीन चेहऱ्याने स्वबळावर अर्थात अपक्ष उभे राहायची हिंमत दाखवली, नाव प्रमोद वाघमारे ( त्याला तेंव्हा अनेकांनी येड्यात काढलं ,पण एन्ड मध्ये त्याने सगळ्यांना येडं बनवलं)
लढाई संपली, निकाल लागला. यंदा निवडून आलेले सर्वच सदस्य प्रथमच निवडून आलेत हे विशेष. भादोलेकरांच्या आशीर्वादाने हा अपक्ष माजी सरपंचाला हरवून मेंबर झाला. एका पॅनेलचे 6 तर दुसऱ्याचे 4 सदस्य निवडून आले. त्यामुळे अर्धा डझनवाले बॉडी बनविणार अन्‌ सत्ता बी त्यांचीच अशी भल्याभल्यांची खात्री झाली. मात्र हार कर भी जितनेवालेको बाजीगर कहते है… हा डायलॉग पाठ असलेल्या चौघांनी गनिमी कावा खेळत राजकीय राडाच करून टाकला! त्यांनी अपक्षाला आपल्यासोबत घेतलेच. पण अर्ध्या डझनमधील एकाला कॅडबरी देत बेमालूम फितवले! थेट 18 फेब्रुवारीच्‍या निवडणुकीतच हा बॉम्ब फुटला. अपक्ष वाघमारे सरपंच, अमीन खान उपसरपंच अन्‌ अल्पमतवाल्याचे सरकार सत्तेत आले! अर्थात बहुमतवाले विरोधी पक्षाच्या बाकड्यावर बसले अन्‌ गावातच नव्हे तालुक्यात भादोला हे गाव गाजले. या धक्कादायक व नाट्यमय घडामोडीत म्हातारे अर्क बरोबरच उद्याचे राजकारण करण्यास सज्ज तरुण तुर्क पण आहेत. एवढी मोठी शिकार करूनही वाघमारे व त्यांच्या मंत्रिमंडळाने साधेपणाने सूत्रे स्वीकारीत जल्लोष देखील साजरा करण्याचे टाळले. यामुळे हे गाव विलक्षण काऊन हाय ते पुन्हा सिद्ध झालंय…

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: