बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र जमून तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन जयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजूपासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी जयंती साजरी करणे अपेक्षित असल्‍याचे प्रशासनाने म्‍हटले आहे.

दरवर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नये. त्याऐवजी बाबासाहेबांच्‍या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. त्याठिकाणी एकाचवेळी अनुयायांची संख्या 5 पेक्षा अधिक असू नये. सामाजिक अंतराचे पालन व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादर चैत्यभूमी येथे जाऊ नये. तेथील कार्यक्रमाचे दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभूमी दादर येथे न येता घरातूनच परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. सार्वजनिक ठिकाणी गाणी, पथनाट्य व्याख्यानाचे आयोजन किंवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण केबलद्वारे किंवा ऑनलाइन करण्याची व्यवस्था करावी. यादिवशी प्रशासनाच्या परवानगीने आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. अशा उपक्रमांचे आयोजन करताना कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे करावे. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: