बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

मतदानाची शुभ घटिका समीप!; 11 हजारांवर अधिकारी, कर्मचारी साहित्यासह केंद्रांकडे रवाना, प्रशासन सज्ज, पोलीस हाय अलर्ट

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बिनविरोधमुळे 527 ग्रामपंचायतींऐवजी आता 498 ग्रामपंचायतींसाठीच मतदान होत असले तरी ग्रामीण भागातील राजकीय रणधुमाळीच्या उत्साहात फारसा फरक पडला नाही. मागील 5 जानेवारीपासून धडाडणार्‍या प्रचाराच्या मुलुख मैदानी तोफा आता थंडावल्या असून, उद्या 15 जानेवारीला रिंगणातील हजारो उमेदवारांचे भाग्य सीलबंद करणार्‍या मतदानाची घटिका आता समीप आलीय! यासाठी प्रसाशन सज्ज झाले असून, आज 14 जानेवारीला 11 हजारांवर अधिकारी, कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह 498 मतदान केंद्रांकडे रवाना झाले.

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर होऊ घातलेल्या मतदानास उद्या 15 जानेवारीला गुलाबी थंडीत सकाळी 7ः30 वाजता प्रारंभ होणार असून संध्याकाळी 5ः30 वाजेपर्यंत मतदानाची धामधूम चालणार आहे. निर्धारित वेळेत केंद्रात प्रवेश केल्यावर मतदान करण्याची मुभा असल्याने मतदान संध्याकाळी उशिरापर्यंत लांबू शकते. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्यासह 6 एसडीओ, 13 तहसीलदारांच्या नेतृत्वात मतदानाची आव्हानात्मक प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त 2171 मतदान केंद्राध्यक्ष, 6919 मतदान कर्मचारी, 2029 शिपाई यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर विविध वाहनाद्वारे हे कर्मचारी निर्धारित केंद्राकडे रवाना झाले. मध्यान्हापर्यंत ते केंद्रात दाखल होणार आहेत. बुलडाण्यात तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या नेतृत्वाखालील मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. याच धर्तीवर जिल्ह्यातील अन्य 12 तहसीलमध्येही कर्मचारी व मतदान साहित्याची मांदियाळी जमली.

217 लालपरीसह 427 वाहनांत वाहतूक

जिल्ह्यात 11 हजारांवर कर्मचार्‍यांना साहित्यासह केंद्रापर्यंत सुखरूप पोहोचविण्यासाठी तब्बल 427 लहान मोठ्या वाहनांचा वापर करण्यात आला. यामध्ये एसटी महामंडळाच्या 217 बस, 3 खासगी मिनीबसनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय 21 जानेवारीपर्यंत विविध शासकीय विभागांची वाहने अधिग्रहित करण्यात आली. तसेच एआरटीओ दराने भाड्याने घेण्यात आलेल्या 151 जीप, टाटा सुमो आदी गाड्यांचा देखील वापर करण्यात आला. याद्वारे मोठ्या संख्येतील ईव्हीएम, निवडणूक साहित्य, कर्मचार्‍यांची 498 केंद्रापर्यंत वाहतूक करण्यात आली. याशिवाय मतदान झाल्यावर या सर्व लावाजम्याला याच वाहनांचा संबंधित तहसील आणि मशीन ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमपर्यंत परतीसाठी वापर करण्यात येणार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: