क्राईम डायरीमुख्य बातम्या

मध्यप्रदेशातून जळगाव जामोदमध्ये विक्रीसाठी आणल्या तीन बंदुकी; एलसीबीच्या धाडसी पथकाने बसस्थानकावरच घातली झडप!

बुलडाणा/जळगाव जामोद (अजय राजगुरे/गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह प्रतिनिधी) ः तीन देशी बनावटीच्या पिस्तूल विकण्यासाठी जळगाव जामोदमध्ये आलेल्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ही धडाकेबाज कारवाई जळगाव जामोदच्या बसस्थानक परिसरात 6 जानेवारी रोजी करण्यात आली. आरोपीच्या ताब्यात तीन पिस्तूल, सहा मॅग्झीन, बारा जिवंत काडतुसे व एक विवो कंपनीचा मोबाइल असा एकूण एक लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी घरीच बंदुकी तयार करून विकत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

राहुल सिंग अजित सिंग पटवा (रा. पचोरी, ता. खगनार, जिल्हा बुर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांवर कारवाईचे आदेश बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. त्यामुळे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांची टीम सज्ज आहे. एक पथकास गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की मध्यप्रदेशातील एक व्यक्ती जळगाव जामोद येथे बंदुकी विकण्यासाठी येणार आहे. या माहितीवरून पथकाने जळगाव जामोद शहरातील बसस्थानक परिसरात सापळा लावला. खबर्‍याने दिलेल्या वर्णनाचा व्यक्ती बसस्थानक परिसरात दिसताच त्याला शिताफीने ताब्यात घेतले. तपासकामी आरोपीला जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सचिन वाकडे यांच्या ताब्यात दिले आहे.

दोन महिन्यांत 11 पिस्तूल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या दोन महिन्यांत सात कारवायांत आठ तलवारी, अकरा पिस्तूल जप्त करून आठ आरोपींना जेरबंद केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), पोलीस निरिक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार गजानन आहेर, संजय नागवे, युवराज शिंदे, सतीश जाधव, संजय मिसाळ यांनी पार पाडली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: