क्राईम डायरीमुख्य बातम्या

मध्यरात्री एलसीबीने रचला सापळा… अवैध रेती वाहतुकीचे 2 ट्रॅक्‍टर स्‍वतःहून चालत आले… देऊळगाव मही परिसरात तब्‍बल 12 लाख रुपयांची कारवाई

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात चोरट्या रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने कंबर कसली आहे. आज, 10 एप्रिलला पहाटे सव्वाच्‍या सुमारास देऊळगावमही (ता. देऊळगाव राजा) परिसरात दोन ट्रॅक्‍टर पकडले. तब्‍बल 12 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल त्‍यांच्‍याकडून जप्‍त करण्यात आला आहे. दोन्‍ही ट्रॅक्‍टरचालकांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

सिमाराम हरिचंद्र चव्हाण (39, रा. वॉर्ड क्र. 5 देऊळगाव राजा) व  रवि लिंबाजी डिघोळे (22, रा.वाकी खुर्द, ता.देऊळगाव राजा) अशी पकडण्यात आलेल्या ट्रॅक्‍टरचालकांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले, की काल रात्री अकराच्‍या सुमारास पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत रामराव जिंदमवार, पोहेकाँ सय्यद हारुण, विलास बाबूराव काकडे, चालक पोलीस नाईक शिवानंद मुंढे हे गस्त घालत होते. बुलडाणा शहरातील स्टेट बँक परिसरात असताना त्‍यांना गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, देऊळगाव मही परिसरात आज रात्री काही ट्रॅक्टर अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणार आहेत. माहिती मिळताच दोन पंचांना सोबत घेऊन एलसीबीचे पथक चिखलीमार्गे देऊळगाव मही परिसरात मध्यरात्रीच धडकले. पंचांसह ते ट्रॅक्टर येण्याची वाट पाहू लागले. आज 10 एप्रिलला पहाटे सव्वाच्‍या सुमारास देऊळगाव राजाच्या दिशेने देऊळगाव महीकडे येताना दोन ट्रॅक्‍टर दिसले. पोलिसांनी त्‍यांना थांबवले व विचारणा केली. तेव्‍हा त्‍यांच्‍याकडे रेती वाहतुकीचा परवाना नव्‍हता. दोन्ही चालकांना पकडून रेतीसह ट्रॅक्‍टर जप्‍त करण्यात आले. प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉलीत एक ब्रास रेती असल्याचे दिसून आले. ही रेती खडकपूर्णा नदीतून आणल्याचे आरोपींनी सांगितले. सिमाराम  चव्हाणच्‍या ताब्‍यातून ट्रॅक्टर (किंमत अंदाजे 5 लाख रुपये), ट्रॉली (किंमत अंदाजे 1 लाख) आणि रेती (किंमत 5 हजार रुपये) असा एकूण 6 लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रवि डिघोळेच्‍या ताब्‍यातून 5 लाखांचे ट्रॅक्टर, एक लाखाची ट्रॉली आणि 5 हजार रुपयांची रेती जप्‍त केली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: