महाराष्ट्र

महाविकास आघाडीतील वादावर पडदा?

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाळत ठेवण्याच्या वक्तव्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमटलेला नाराजीचा स्वर लक्षात घेऊन काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पॅचअप करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. पटोले यांना मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांच्या वक्तव्याविषयी संताप व्यक्त केला. एवढेच नाही, तर सरकारच्या स्थैर्याला पटोले सुरूंग लावत असल्याची टीका केली. सरकार पडले तर त्याचा दोष काँग्रेसला जाईल, असे वाटल्याने महाराष्ट्राचे प्रभारी के. एच. पाटील तातडीने महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांच्यासह बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यांशी चर्चा केली. पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत असले, त्यात काहीच तथ्य नाही. त्याचे कारण पाटील वगळता अन्य नेत्यांना यापूर्वीच पवार यांच्या तब्येतीची चाैकशी केली आहे. पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच मी पटोलेंसारख्या लहान माणसांबाबत मी बोलत नसतो, असे सांगत त्यांना टोला हाणला होता. पवार यांच्या भेटीत महाविकास आघाडीत सुरू असलेल्या धुसफुशीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत, तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबतदेखील या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: