क्राईम डायरीमुख्य बातम्या

माझ्या पत्नीसोबत तुझे अनैतिक संबंध, पैसे दे नाही तर बदनामी करेन… बुलडाण्याच्या उद्योजकाला व्हॉट्स अ‍ॅपवरून धमकी, पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माझ्या पत्नीसोबत तुझे अनैतिक संबंध होते, अशी बदनामी करण्याची धमकी देऊन बुलडाण्याच्या उद्योजकाला 10 लाख रुपये खंडणी मागणार्‍या युवकाला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज, 17 जानेवारीला अटक केली आहे.

अमोल भोजराज देशमुख (रा. देऊळघाट, ता. बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने गजानन टॉकिजचे मालक विनोद केडिया (65, रा. भोंडे सरकार चौक, बुलडाणा) यांना 12 जानेवारीला रात्री व्हॉट्स अ‍ॅप मेसेज करून 10 लाख रुपये खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर केडिया व अमोलच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते, अशी बदनामी करेल, अशी धमकी त्याने दिली होती. श्री. केडिया यांनी कर नाही तर डर कसली, या उक्तीप्रमाणे थेट कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना भेटून या धमकीची माहिती दिली. श्री. चावरिया यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी 17 जानेवारीला अमोल देशमुख यास देऊळगाव घाट रोडवरील लालमाती परिसरात 50 हजार रुपये खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक विजय मोरे, सहायक फौजदार प्रकाश राठोड, पोहेकाँ सय्यद हारुण, पो.ना. लक्ष्मण कटक, पोकाँ विजय वारूळे, पोकाँ दीपक वायाळ, चालक सुरेेश भिसे यांनी केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: