क्राईम डायरीमुख्य बातम्या

माधुरी मर्डर मिस्‍ट्री : हिसकावलेला मोबाइल देतो म्हणून ‘माजी’ने बोलावले होते… ‘आजी’ प्रियकराने सावध करूनही तिने दूर्लक्ष केले…!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घटस्‍फोटित एसटी वाहक माधुरी मोरे (25, रा. अंत्री खेडेकर, ता.चिखली) हिच्‍या खून प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी तपासात समोर येत आहेत. माजी प्रियकर अनिल भोसलेने 9 एप्रिलला तिचा मोबाइल हिसकावला होता. तो मोबाइल परत करतो म्‍हणून त्‍याने तिला 15 एप्रिलच्‍या सायंकाळी मेरा फाट्यावर बोलावले. तिथून अंत्री खेडेकरपर्यंत येताना मध्येच दोघांत पुन्‍हा वाद सुरू झाला आणि तयारीनिशी आलेल्या अनिलने तिची चाकूने वार करत हत्‍या केली. अनिलला भेटायला येण्याआधी माधुरी तिच्‍या आजी प्रियकर अरुण काकडे याला चिखलीला भेटून आली होती. दोघे सोबत असतानाच अनिलचे कॉल येत होते. त्‍यामुळे काकडेने तिला सावध केले होते. पण तिने दुर्लक्ष करत मोबाइल घेण्यासाठी आली अन्‌ घात झाला…
बुलडाणा आगारातील एसटी वाहक माधुरीचा 5 वर्षांपूर्वी घटस्‍फोट झाला होता. जाफराबाद आगारात कार्यरत असताना तिची सहकारी एसटी वाहक अनिल भोसलेशी ओळख झाली होती. त्‍यातून दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी तिची बदली बुलडाणा आगारात झाली होती. त्‍यानंतर तिची ओळख चिखली येथील अरुण काकडेसोबत फेसबुकवरून झाली. काकडेसाेबत तिचे प्रेमसंबंध सुरू झाले. ही बाब अनिलला कळल्‍याने त्‍याने तिला ते संबंध तोडण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली होती. 9 एप्रिल रोजी माधुरीचे अनिलसोबत बुलडाणा बसस्थानकावरच दुपारी 2:30 वाजता कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणात अनिलने माधुरीचा मोबाईल हिसकावला होता. तेव्हापासून माधुरी तिच्या आईचा मोबाइल वापरत होती. 15 एप्रिल रोजी अनिलने माधुरीशी संपर्क करून तुझा माझ्याकडे असलेला मोबाइल तुला देऊन टाकतो, असे म्हणत मेराखुर्द फाटा येथे बोलावले. मात्र अनिलचा इरादा वेगळाच होता. तो पूर्ण तयारीनिशी आला होता. चाकू त्याने सोबतच आणला होता. 15 एप्रिलच्या सायंकाळी चिखलीचा प्रियकर काकडे याचा निरोप घेऊन माधुरी मेरा खुर्द फाटा येथे पोहोचली. तिथे तिचा माजी प्रियकर अनिल भोसले आधीपासूनच हजर होता. मेरा खुर्द ते अंत्री खेडेकर दरम्यान दोघांमध्ये पुन्हा प्रेम प्रकरण व मोबाइलवरून वाद झाला. त्यातच अनिलने आधीपासूनच सोबत आणलेल्या चाकूने माधुरीची गळा चिरून हत्या केली. तिचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात टाकून दिला. दरम्यान अंढेरा पोलिसांनी वेगाने तपास करत अनिल भोसले याला देऊळगाव राजा येथून ताब्यात घेतले. आज, 17 एप्रिलला त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: