मारहाण, शिविगाळ केल्याने व्‍यथित झालेल्या विवाहितेने विष घेऊन संपवले आयुष्य!; खामगाव तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेजारील 6-7 लोकांनी शिविगाळ करून मारहाण केल्याने झालेला अपमान असह्य होऊन 25 वर्षीय विवाहितेने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिवरा खुर्द (ता. खामगाव) येथे 13 मे रोजी दुपारी घडली. या प्रकरणी 14 मे रोजी विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सौ. …
 

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेजारील 6-7 लोकांनी शिविगाळ करून मारहाण केल्याने झालेला अपमान असह्य होऊन 25 वर्षीय विवाहितेने विष घेऊन आत्‍महत्‍या केल्याची धक्‍कादायक घटना हिवरा खुर्द (ता. खामगाव) येथे 13 मे रोजी दुपारी घडली. या प्रकरणी 14 मे रोजी विवाहितेच्‍या आईने दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. मनीषा अनिल बगे (25, रा. हिवरा खुर्द) असे आत्‍महत्या केलेल्या विवाहितचे नाव आहे. तिची आई गं.भा. अनिता अंकुश मेहेंगे (45, रा. शिंदखेड लपाली ता. मोताळा, ह. मु. हिवरा खुर्द) या महिलेने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की त्‍यांचे जावई अनिल बगे मजुरीसाठी गुजरातला असल्याने त्‍या नातवंडांना सांभाळण्यासाठी हिवरा खुर्द येथे  8 दिवसांपूर्वी आल्या होत्‍या. त्‍यांच्‍या घराशेजारी मीराबाई अंकुश बगे कुटुंबासह राहते. 12 मे रोजी संध्याकाळी मुलगी मनीषाला मीराबाई व तिची मुलगी शारदा हिने घराबाहेर बोलावून केस धरून मारहाण केली. त्‍यावेळी अनिताबाईंनी भांडण सोडवले. दुसऱ्या दिवशी 13 मे रोजी सकाळी 10 वाजता सोपान वासुदेव रावनचवरे हा घरी आला व तुला आमच्या घरी समजावण्यासाठी बोलावले आहे, असे म्‍हणाला. मनीषा त्‍याच्‍या घरी गेली. पाठोपाठ मनीषाची सासू व सासरा तिच्‍यामागे गेले. बराच वेळ झाला तरी मुलगी परत आली नाही म्हणून अनिताबाईसुद्धा रावनचवरेच्या घरी गेल्‍या. तिथे सत्यभामा वासुदेव रावनचवरे, मीराबाई आकाश बगे, कमिनाबाई समाधान बगे, पुष्पाबाई निवृत्ती बगे, सोपान रावनचवरे, एकनाथ रावनचवरे, शारदा आकाश बगे मनीषाला मारहाण करत होते. मुलीला वाचविण्यसाठी धावलेल्या अनिताबाईंनाही त्‍यांनी मारहाण केली.

या घटनेमुळे मनीषाला मनस्ताप झाला. ती शेतात गेली. सर्व नातेवाईकांनी तिचा शोध घेऊन सकाळी 11 च्‍या सुमारास तिला घरी परत आणले. तिला समजावत असताना तिने घरातून पाणी पिऊन येते म्‍हणून तिच्‍या खोलीत गेली. बराच वेळ होऊनही बाहेर आली नाही. सर्व जण तिला पाहण्यासाठी गेले असता ती जमिनीवर पडलेली होती. तिच्या हातात शेतातील विषारी औषधाची बाटली होती. बाटली हिसकावली तेव्हा तिने सांगितले की त्‍या लोकांनी मला मारहाण केली. मला शिविगाळ केली. माझी अब्रू चव्हाट्यावर आणल्यामुळे मी विष पिले आहे. शिवाजी बगे व क्रिष्णा बगे यांनी मनीषाला खामगावला सरकारी दवाखान्यात नेले. मात्र उपचार चालू असताना दुपारी 12.30 तिचा मृत्‍यू झाला. पोलिसांनी 6-7 महिला-पुरुषांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार सचिन चव्हाण करत आहेत.