क्राईम डायरीमुख्य बातम्या

मालमत्तेच्‍या वादातून देऊळगाव राजात दोन गटांत सशस्‍त्र हाणामारी; 11 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः मालमत्तेच्‍या कारणावरून दोन गटांत लाठ्या-काठ्या, तलवारीने एकमेकांवर वार करत हाणामारी झाली. ही घटना देऊळगाव राजा शहरातील दुर्गापुरा भागात 21 मे रोजी सकाळी 9 च्‍या सुमारास घडली. या प्रकरणी परस्‍परविरोधी तक्रारीवरून 11 जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. घटनेत 5 जण जखमी झाले आहेत.

सौ. अनिता कौर अजितसिंग बावरे (35, दुर्गापुरा) यांनी तक्रार दिली की त्‍यांचे पती अजितसिंग बावरे यांनी देऊळगाव राजा शहरात अजिंठा गेस्ट हाऊसमागे भरत मांटे (रा. खल्याण गव्हाण) यांच्या मालकीची मालमत्ता असलेली 278.81चौरस फूट जमीन 30 एप्रिलला इसार पावती करून घेतली आहे. या जमिनीवर त्‍यांनी टिन शेड उभे केले आहे. 21 मे रोजी सकाळी 9 वाजता या टिन शेडमध्ये अजय शिवरकर, सुनिल शिवरकर, महेश शिवरकर, शंकर शिवरकर, सायुब  शिवरकर हे सामान टाकताना दिसले. त्‍यामुळे त्‍यांनी तातडीने पतीला बोलावून घेतले. अजय शिवरकर याला टिनशेडमध्ये सामान टाकण्याबद्दल विचारले असता  त्‍याने ही जमीन माझ्या आजोबाच्या नावाने आहे, असे सांगितले. आम्‍ही आमच्‍या ओळखीचे सुभाष दराडे यांना बोलावून घेतले. दराडे यांना त्‍याला ही जागा भरत मांटे यांच्याकडून इसार पावती करून घेतली आहे, असे म्हटले असता अजय शिवरकर व त्‍याच्‍या साथीदारांनी घरात पळत जाऊन लाठ्या काठ्या व तलवार घेऊन आले व आमच्‍यावर हल्ला चढवला. पतीसह दराडे यांना मारहाण केली. अजय शिवरकर याने दराडे यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची चैन (किमत 1,20,000 रुपये) तोडून घेतली. शंकर शिवरकर याने माझ्यावर तलवारीने वार केला पण तो मी चुकविला. मी जोरात ओरडल्याने पतीने वाचवले. भांडण सुरू असताना गजानन काकड, विकास डोइफोडे, आयुब शहा यांनी धावून भांडण सोडवले.

या घटनेत परस्‍परविरोधी तक्रार झाली असून, सौ. सुनिता संजय शिवरकर (34, रा. वॉर्ड नं. 8 दुर्गापुरा) हिने तक्रार दिली, की गल्लीत राहणारे अजितसिंग ऊर्फ धोंडू बावरे, अर्जुन अजितसिंग बावरे, जोगिंदर पासिंग बावरे, सुभाष  दराडे, करण अजितसिंग बावरे, बलजित अजितसिंग बावरे (सर्व रा. देऊळगाव राजा) आमच्‍या घरी आले व म्हणाले की, तुम्ही आमच्या जागेत कसे काय राहतात. तेव्हा माझे पती संजय शिवरकर यांनी त्यांना ही जागा आम्ही विकत घेतली असून, आमच्या मालकीची आहे, असे सांगितले. त्‍यावेळी अजितसिंह बावरे व त्‍याच्‍या साथीदारांनी तुम्ही घराच्या बाहेर या तुम्हाला दाखवितो जागा कोणाची आहे, असे म्हणून शिविगाळ केली. बावरे व त्‍याच्‍या साथीदारांनी मला व माझ्या पतीला लाथा बुक्‍क्यांनी व काठ्यांनी मारहाण केली. मला केस धरून खाली पाडले व जिवाने मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या. घरातील सामानाची फेकझोक करून नासधूस केली आहे.

या दोन्‍ही तक्रारींवरून दोन्‍ही गटांतील 11 जणांविरुद्ध देऊळगाव पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: