मार्केट लाइव्ह

मित्राने दिले चॅलेंज अन् मनात पेटली जिद्द… उभी राहिली ‘शिवसाई’!

एका मित्राने सतराएक वर्षांपूर्वी डायरेक्ट चॅलेंजच केले की, पतसंस्था काढणे म्हणजे सोपं काम नव्हे. त्याला लई डोकं लागते. त्यामुळे माझी जिद्द निर्माण झाली, ती आपली पतसंस्था सुरू करण्याची. सन 2005 मध्ये ती मूर्तरूपात साकारली अन् बुलडाण्यात उभी राहिली शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था! आज ती शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील यशस्वी, विश्‍वसार्ह संस्था ठरलीय!

‘शिवसाई’चे सर्वेसर्वा अन् राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात वावरणारे, चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे धनी असलेले दत्तात्रय श्रीराम लहाने बुलडाणा लाईव्हशी बोलताना आपल्या शिवसाईची कहाणी सांगत होते. यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर आनंद, श्रमसाफल्याचे भाव दाटून आल्याचे दिसून आले. जांभरूण रोडवरील सुसज्ज कार्यालयात ही चर्चा रंगली. त्यावेळी स्वतः उच्च शिक्षित असलेल्या लहानेंनी हा मजेदार इतिहास विशद करतानाच वर्तमान काळातील प्रगती, विकास, विस्तार याचाही बोलका आढावा सादर केला. आई- वडिलांसह सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे व बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक हे आपले प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सुरुवातीला 1 हजारच्या ठेवीसाठी 2 तास लोकांच्या घरी बसावे लागले.

आज संस्थेची आर्थिक प्रगती, ठेवीची लक्षणीय संख्या, भांडवल, नफा याची आकडेवारी वाढतच गेली. सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांचा दृढ विश्‍वास ही आमची मोठी उपलब्धी असल्याचे ते सांगतात. अलीकडे शेतकर्‍यांना गाई, म्हशी, शेळीपालन या पूरक व्यवसायाकरिता कर्जपुरवठा सुरू केला आहे. महिला बचतगटांना कर्ज, अर्थसहाय्य सुरू केले. ग्राहकांच्या सुविधेसाठी आरटीजीएस, एनईएफटी, लॉकर, नेट बँकिंग, आरडी, घरपोच सेवा आदी सुविधा आहेत. याला तत्पर, विनम्र सेवा, प्रामाणिकपणा, ठेवीदारांना अर्ध्या रात्रीही पैसे मिळण्याची खात्री, ठेवींना संरक्षणाची जोड आहे. हा व्यवसाय नव्हे तर सेवा आहे, असे मानणार्‍या श्री. लहाने यांनी कर्ज भरण्याची वृत्ती नसणे, ते भरताना अनेक अडचणी सांगणे ही आमची मोठी अडचण ठरते. कर्ज घेताना सर्व गोष्टींसाठी तयार असलेली ही मंडळी कर्ज फेडताना असे वागतात, अशी खंत बोलून दाखविली. सरकारने पतसंस्थांना सुद्धा कृषी कर्ज व अन्य कर्ज देण्याचे अधिकार द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: