महाराष्ट्र

लॉकडाऊन नव्हे, पण कठोर निर्बंध दोन दिवसांत जाहीर करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनामुळे कालचा दिवस बरा होता,असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. दरदिवशी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या सर्वांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पण बेड्स, व्हेंटिलेटर,औषधी साठा उपलब्ध झाला तरी डॉक्टर, नर्स, तज्ज्ञ, आरोग्य कर्मचार्‍यांची उपलब्धता कशी होणार? ती होत नाही तोपर्यंत तरी वाढते रुग्ण आणि स्वत:चा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. त्यामुळे लोक नियम पाळणार नसतील तर राज्यात लॉकडाऊन हे करावेच लागेल. पण सरकार तूर्तास तो निर्णय घेणार नसून त्याआधीचा टप्पा म्हणून येत्या दोन-दिवसांत कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्याची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची चर्चा सुरू होती. त्याबाबत नेमकी स्थिती स्पष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी अर्धा तास जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे हे जरी खरे असले तरीही सर्वाधिक आरोग्य सेवा या आपल्याच राज्यात उपलब्ध आहेत. काल एका दिवसात आपण तीन लाख लोकांचे लसीकरण केले आहे. इतक्या नागरिकांचे एकास दिवसात लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आगामी काळाल लसीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसीयू बेड्स, साधे बेड्स अऑक्सिजन बेड्स यांची संख्या आपण वाढवत आहोत. ती आणखी वाढवत नेण्याचीही सरकारची तयारी आहे. परंतु ही यंत्रणा वापरण्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी कुठून उपलब्ध होणार? ते काही अचानक वाढवता येत नाहीत. शिवाय सध्या आहे ती यंत्रणा गेल्या वर्षभरापासून हा ताण सहन करत आहे. त्यावर आणखी किती ओझे टाकायचे यालाही काही मर्यादा आहेत.या सर्वांचा विचार करून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. मास्क न वापरण्यात कसला आलाय पुरुषार्थ? उलट त्यामुळे तुमचा स्वत:चा, तुमच्या कुटुंबाचा आणि इतरांचा जीव धोक्यात येईल. आपण काहीही लपवत नाही, लपवणार नाही. राज्यात एकही रुग्ण लपवला नाही. मला व्हिलन ठरवले गेले, शिव्या दिल्या, कितीही नावे ठेवले तरीही मी लोकाांसाठी काम करतच राहीन. याचे राजकारण न करता सर्वांनी मिळून सहकार्य केले तरच आपण या संकटातून मात करू शकू. कोरोनाचा विषाणू रोज त्याची रचना, रूप बदलत आहे. पहिल्यापेक्षा आताची लाट घातक आहे. इतर देशांचा विचार करता याच्या आणखी लाटा येऊ शकतात. त्या रोखायच्या असतील तर सर्वांनीच सर्वच नियम पाळले पाहिजेत.
लग्न समारंभ, राजकीय सभा, मोर्चे, इतर कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात येतील. लॉकडाऊनची चर्चा सुरू होती तेव्हा त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा अनेकांनी दिला. मी त्यांना आवाहन करतो की, रस्त्यावर उतरायचेच असेल तर लॉकडाऊनविरोधात नव्हे तर तिसरी लाट येऊच देणार नाही या निर्धाराने ती रोखण्यासाठी पुढे या. कोरोना योद्धा म्हणून काम करणार्‍या यंत्रणेला समजून घेऊन त्यांना बळ देण्यासाठी रस्त्यावर उतरा, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: