क्राईम डायरीमुख्य बातम्या

मुलगी पळवून नेलेल्यांना आई म्हणाली, मला एकदा तरी तिला भेटू द्या… ते धक्काबुक्की करत म्हणाले, जीवे मारून टाकू!; खामगाव न्यायालय परिसरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नानंतर अवघ्या 8 दिवसांत पतीला सोडून आत्येभावासोबत तिने पलायन केले. पतीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिला प्रियकरासह ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. या ठिकाणी तरुणीची आईसुद्धा आली. तिने मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मुलीच्या प्रियकराने व त्याच्या कुटुंबियांनी मुलीच्या आईला लोटपोट करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुलीच्या आईने आज, 9 जानेवारीला खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून पोलिसांनी प्रियकरासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीची आई 45 वर्षीय असून, वडोदा पानाचा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव खानदेश येथील मूळ रहिवासी आहे. सध्या राम गावंडे फार्महाऊस, चिखला, ता. पनवेल, जि. रायगड येथे मजुरी करते. पोलिसांनी तरुणी ज्याच्यासोबत गेली तो पवन किसन सोनोने आणि पवनचा भाऊ प्रल्हाद व आई गोकर्णा तसेच आकाश गुरव (सर्व रा. जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांच्याविरुद्ध लोटपोट, जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी कल्पनाचे (नाव बदलले आहे) लग्न 27 नोव्हेंबर 2020 ला टेंभूर्णा येथील तरुणासोबत झाले होते. 5 डिसेंबर 2020 ला कल्पना पवन किसन सोनोने (रा. जामोद) याच्यासोबत निघून गेली. याची तक्रार जावयाने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत खामगाव न्यायालयात हजर केले. या ठिकाणी मी मुलीला भेटण्यास गेली असता संध्याकाळी तिथे पवन आणि त्याचे कुटुंबिय होते. त्यांना मी मुलीला भेटू देण्याची विनंती केली. मात्र त्यांनी काही गरज नाही भेटायची, असे म्हटले. त्यावर मी आग्रह धरल्याने त्यांनी मला लोटपोट केली. माझ्या दोन्ही हातांना नखे लागली. त्यांनी लोटपोट केल्याने गळ्यातील पोत तुटून पडली. त्यांनी शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी पवनसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास खामगाव शहर पोलीस करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: