बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

मोहरम साध्या पद्धतीने साजरा करावा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोहरम 19 ऑगस्ट रोजी पाळण्यात येणार आहे. मोहरम निमित्त विविध ठिकाणी मुस्लीम बांधवांतर्फे वाझ, मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले असल्याने इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरम साध्या पद्धतीने पाळण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मोरहम महिन्याच्या 9 व्या दिवशी म्हणजेच 18 ऑगस्ट 2021 रोजी कत्ल की रात तसेच 10 व्या दिवशी योम ए आशुरा हे दिनांक 19 ऑगस्ट रोजी येत आहे. त्या निमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुका काढता येणार नाही. कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही. खासगी मातम देखील शासनाच्या काटेकोर पालन करून घरीच करावेत.

सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम, दुखवटा करू नये. वाझ, मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया, आलम काढू नयेत. सबील, छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. या ठिकाणी सोशल डिस्टसिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे लक्ष द्यावे. कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: