बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

…म्‍हणून पालकमंत्र्यांनी नागरिकांना सुनावले!; कोरोना गेल्यासारखे वागू नका!!, विनामास्‍क फिरणाऱ्यांवर कारवाईचे पोलिसांना निर्देश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रुग्‍णसंख्या कमी होताच कोरोना गेल्यासारखे नागरिक वागत आहेत. सुरक्षित अंतर, मास्‍क वापरण्यासारखे नियम पाळण्यात हलगर्जीपणा वाढला आहे. अशा नागरिकांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सुनावतानाच, मास्क वापरणे, सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे व हात सॅनीटाईज किंवा वारंवार धुणे या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन सर्वांना केले. पोलीस विभागाने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, असे आदेशही दिले.

दुसऱ्या लाटेमधील रुग्णसंख्या ओसरू लागली आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासन, प्रशासनाने काटेकोर नियोजन करत प्रयत्‍न केले. दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रुग्णसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या गृहीत धरून आरोग्य यंत्रणा भविष्यात सज्ज ठेवावी. त्या पद्धतीने नियोजन करावे, अशी सूचना त्‍यांनी प्रशासनाला केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्र्यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, सहायक आयुक्त श्री. बर्डे आदी उपस्थित होते. भविष्यात कोविड रुग्णांची 10 हजार संख्या लक्षात घेता नियोजन करण्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की त्यानुसार ऑक्सिजन बेड, नॉन ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन निर्मिती साठा व पुरवठा, जिल्ह्यातील ऑक्सिजन लिक्वीड टँक, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन, औषधांचा साठा आदींची व्यवस्था करण्यासाठी आतापासून कामाला लागावे. आरोग्य यंत्रणेतील पायाभूत सोयी सुविधा बळकट कराव्यात. पीएसए प्लांटसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील जुन्या कोविड केअर सेंटर किंवा तालुक्यातील मोठे गाव असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आदींमध्ये ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था करावी. तिसरी लाट गृहीत धरून बाल रोग तज्ज्ञांची सेवा अधिग्रहीत करून ठेवावी. बाल रोग वॉर्ड तयार करून त्यामध्ये ऑक्सिजनची सुविधा तयार करून ठेवावी. म्युकर मायकोसिस रुग्णांचा उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, की या आजारावरील महागड्या औषधांचा समावेशही महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यंत्रणांनी समन्वय ठेवत कोविड पश्चात उपचार पद्धती राबवावी. कोविड होऊन गेलेल्या रुग्णांशी संवाद साधून अथवा त्यांना संपर्क करून तब्येतीची विचारपूस करावी. जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्ट कोविड रुग्णांसाठी वॉर्ड तयार करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

नवीन प्रशासकीय इमारतीसाठी जागेची पाहणी
जुनी प्रशासकीय इमारत व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या नवीन कार्यालय इमारतीसाठी जागेची पाहणी आज, 11 जून रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बसस्थानकासमोरील प्रशासकीय इमारतीच्या आवारात केली. यावेळी त्यांनी जागेचा नकाशा बघितला व नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासंदर्भात माहिती घेतली. या परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाची नवीन कार्यालय इमारतीची सुद्धा चाचपणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, सहायक आयुक्त श्री. बर्डे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: