बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

या बातमीचा उद्देश आपल्याला भीती दाखवणे नव्हे!, तर…; बुलडाण्यातील हादरवून टाकणारे चित्र

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सध्या कोरोनाने जिल्ह्याला खूपच मोठ्या संकटात टाकले आहे. भयग्रस्‍त वातावरणातून जिल्हावासीय जात आहेत. रोजच्‍या बळींची संख्या आणि आढळणाऱ्या बाधितांची संख्या या भीतीत भरच घालत आहे. शासकीय आकडेवारीत मृतकांची संख्या कमी दिसत असली तरी आज, 21 एप्रिलला बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकातील स्‍मशानभूमीत जाऊन बुलडाणा लाइव्‍हने माहिती घेतली असता वेगळेच चित्र समोर आले आहे. दिवसाला 5 ते 10 मृतदेहांवर अंत्‍यसंस्‍कार या ठिकाणी केले जात आहेत. मृतदेह जाळण्यासाठी जागा पुरत नाही. मग मिळेल त्‍या जागवेर सरण रचले जाते. अनेक मृतदेहांच्‍या अंत्‍यसंस्‍कारालाच नातेवाइक येत नाहीत, तिथे रक्षा विसर्जनासाठी तर येण्याचा प्रश्नच नाही. अशा वेळी स्‍मशानजोगीच रक्षाविसर्जन करून टाकत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले.

शंकर रामचंद्र गायकवाड 20 वर्षांपासून या ठिकाणी मृतदेह जाळण्याचे काम करतात. ते परिवारासह इथेच राहतात. आजवरच्‍या काळात मृत्यूचे इतके भीषण तांडव कधी पाहिले नसल्याचे ते सांगतात. एकाच वेळी अनेक मृतदेह अंत्‍यसंस्‍कारासाठी येत असल्याने शेडच्‍या बाहेर लाकडे रचून चिताग्‍नी दिला जातो.  1 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्‍यान 60 मृतदेहांवर अंत्यसंस्‍कार केल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाणा शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्‍यूचे तांडव वाढतच चालल्याने यापुढील काळ आणखी भयंकर जाणार असल्याची भीतीही श्री. गायकवाड यांनी व्‍यक्‍त केली. अंत्‍यसंस्‍कारासाठीआणल्या जाणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढत असली तरी लाकडांचा साठा मात्र पुरेसा नसतो. अशावेळी मोठी कसरत होते, असेही श्री. गायकवाड सांगतात.

नातेवाइक येत नाहीत…

कोरोनामुळे मृत्‍यू झाला की नातेवाइक येतीलच असे नसते.  अनेक नातेवाइक जाणूनबुजून, भीतीपोटी पाठ फिरवतात. रक्षाविसर्जनालाही ते येत नाहीत. राखेत कोरोनाचे विषाणू खरंच असतील का, याचा विचार सुज्ञ, सुशिक्षित लोक करत नसतील तर काय म्‍हणावे, अशी भावनाही श्री. गायकवाड यांनी व्‍यक्‍त करत, अशा वेळी आम्‍हीच रक्षाविसर्जन करून परंपरा निभावत असल्याचे ते म्‍हणाले.

बुलडाणेकरांनो आता तरी सावध व्‍हा…

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे अत्‍यंत वाईट परिस्‍थिती आहे. रुग्‍णालयात दाखल केलेल्या रुग्‍णावर वेळीच उपचार होतीलच, त्‍याला सर्व सुविधा मिळतीलच असे नाही. रुग्‍णालयात बेड उपलब्‍ध होत नाहीत, ऑक्सिजन वेळेत उपलब्‍ध होत नाही, रेमेडसिविर इंजेक्‍शन मिळेलच याचीही शाश्वती नाही. त्‍यामुळे कोरोनापासून दूर राहा. मास्‍क वापरा. गर्दी टाळा. वेळच्‍या वेळी सॅनिटायझरचा वापर करा. प्रशासनाने लावलेल्या नियमांना गांभीर्याने घ्या. कोरोना कुणालाही होऊ शकतो हे लक्षात घ्या. अन्यथा उद्या चिता जाळली जाईलच याची शाश्वती नाही, एवढे लक्षात घ्याच!

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: