बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

रमजान ईद साध्या पद्धतीने साजरा करावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षी 14 एप्रिलपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला असून 13 किंवा 14 मे चंद्रदर्शनानुसार रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मात्र सध्या कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्‌भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता रमजान ईद साधेपणाने साजरा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पवित्र रमजान ईदसाठी मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करून ब्रेक द चेन आदेशाचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणासाठी मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. कोविड या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात कलम 144 लागू आहे. त्यामुळे संचारबंदी कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नये. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या काळात अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: