करिअर

राईट जॉब नेमका कोणता?

पदवी हातात पडल्यावर नोकरी करायचीच! हा निर्णय सतीशने मनाशी पक्का केला होता. निर्णय घेऊनही त्याच्या चेहर्‍यावर काहीसे चिंतेचे भाव दिसत होते. एकीकडे शिक्षण संपल्याचा आनंद तर दुसरीकडे येणार्‍या आयुष्याची हूरहूर. आईवडिल, नातेवाईक आणि मित्रांना सांगताना, मला माझ्या मनात आहे तीच नोकरी करायची आहे, हे ठामपणे सांगितलं. पण नेमकं कसं ठरवावं? हा एक मोठा प्रश्‍न त्याच्यासमोर होता. वर्तमानपत्रातील प्रत्येक जाहिरात वाचताना असं वाटण्याचं की ही नोकरी मला मिळावी. पण नेमकं सांगणं कठीण जात होतं. असा गोंधळ अनेकांच्या मनात असतो आणि राइट जॉब याचा नेमका विचार कसा केला पाहिजे, यासाठी काही मुद्दे विचारात घ्यावेत… राइट जॉब ही वैयक्तिक संकल्पना आहे. दुसर्‍याकडे बघून किंवा दुसर्‍यांचा विचार करून निर्णय घेऊ नये. अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्यावा पण निर्णय स्वत:चा चोखंदळपणे घ्यावा. नोकरी म्हणजे नुसताच पैसा मिळवण्याचं साधन नसून, आपल्यात असलेल्या बुद्धीचा, कौशल्याचा आपण घेतलेल्या शिक्षणाचा उत्तमरित्या उपयोग करून एक अर्थपूर्ण आणि सुखी आयुष्याकडे जाण्याचा मार्ग आहे. नोकरी निवडताना आपण कोणत्या प्रकारचे काम करू शकतो, म्हणजेच मी दिवसांतून किती तास काम करू शकतो, मला एकट्याने काम करायला आवडेल की मला असं काम करायला आवडेल ज्यात माझा लोकांशी जास्त संपर्क येईल, अशा प्रश्‍नांची उत्तरं शोधायला हवीत. कोणत्या प्रकारच्या कंपनीत काम करायला आवडेल? नामांकित की छोट्या कंपनीत? कारण दोघांच्याही कामाच्या स्वरूपात फरक आहे. वेळ, पैसा, करिअरची प्रगती, स्थैर्य या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला हवा. कोणत्या नोकरीत किती शिकायला मिळणार आहे. याचंही भान ठेवायला हवं. नुसताच मोठ्या ब्रँडचा ध्यास घेऊ नये. हेही महत्त्वाचेच… – दिलेलं काम मनापासून करणं महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या पुढच्या करिअरचा प्रवास याच्या पायावरच उभा राहणार आहे, याची जाणीव ठेवा. – ज्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करत आहात त्या कंपनीचा थोडा अभ्यास करा, ती इंडस्ट्री (क्षेत्र) कशी आहे, याचाही विचार करावा. – निर्णय घेता येत नसेल किंवा मनात स्पष्टपणे ड्रीम जॉबची कल्पना नसेल, तर थोडे प्रयोगशील व्हा. मिळालेल्या संधीचा पूर्णपणे उपयोग करा, ज्यामुळे बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील. – पहिल्याच नोकरीमध्ये सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतील, अशी अपेक्षा मनात बाळगू नका, झालेच तर छान, पण नाही झाले तरीही शिकण्याची संधी म्हणून त्याचा सकारात्मक दृष्टीने स्वीकार करा. – एक लक्षात ठेवा, काहीवेळा राइट जॉब मिळण्यात वेळ लागू शकतो तेव्हा, जो जॉब मिळाला आहे त्याला राइट करण्याचा प्रयत्न करा, योग्य संधी मिळेपर्यंत!

 
 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: