बुलडाणा (घाटावर)

राजमाता जिजाऊ जन्मस्थळाच्‍या विकासासाठी 3 कोटी 39 लाख रुपये मंजूर; माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्‍या प्रयत्‍नांना यश

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माँ जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा नगरीचा विकास व्हावा, तत्कालिन पुरातन वास्तूंचे संवर्धन व्हावे, नुतनीकरण व्हावे यासाठी ३११ कोटींचा सिंदखेड राजा विकास आराखडा मंजूर आहे. मात्र निधीअभावी कामे बंद पडली होती. ती पुन्‍हा सुरू होणार असून, यासाठी 31 मार्चला राज्‍य सरकारने विकासासाठी ३ कोटी ३९ लाख रुपये मंजूर केले आहे. या निधीसाठी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी प्रयत्‍न केले होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना यश मिळाल्याचे मानले जात आहे.

आमदार असताना डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शासन दरबारी या विकास आराखड्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे ३११ कोटींचा हा आराखडा मंजूर झाला आहे. यापैकी प्राथमिक स्वरूपात २५ कोटी रुपयेसुद्धा मंजूर झाले होते. या अंतर्गत कामांना सुरुवात सुद्धा झाली होती. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामांचे भूमिपूजन सुद्धा केले होते. परंतु काही कारणास्तव निधी अभावी विकास कामे बंद पडली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोणार येथे आले असता माजी खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी हा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी त्‍यांच्‍याकडे केली होती. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची सुद्धा प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदन देऊन निधीसाठी मागणी केली होती. त्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. माजी आमदार डॉ. खेडेकर तसेच सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या जिल्हा स्तरावरील कामांना स्पिल ओव्हरची रक्कम ३१ मार्च २०२१ रोजी शासनाने काढलेल्या जी.आर नुसार मंजूर करण्यात आली आहे. जी.आर नुसार राजमाता जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी ३ कोटी ३९ लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच कामांना सुरुवात होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्वरित निधी सुद्धा त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: