बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बदलणार? विस्कळीत संघटन, कमकुवत पक्ष नेतृत्वाचा मुद्दा ऐरणीवर, मंत्री जयंत पाटील करणार पोस्टमार्टम!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात आघाडीचा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्ह्यातील स्थान चौथ्या क्रमांकाचे का? असा रोखठोक सवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उद्यापासून सुरू होणार्‍या 2 दिवसीय मुक्कामी दौर्‍यानिमित्त ऐरणीवर आलाय! यामुळे या दौर्‍यात मंत्री पाटील पक्षाच्या कमकुवत संघटन व तळाच्या क्रमांकाचे पोस्टमार्टम करतानाच जिल्हाध्यक्ष बदलावर खलबतेवजा चिंतन करणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. यामुळे वरकरणी हा दौरा नजीकच्या काळातील राजकीय वादळापूर्वीची शांतता असल्याचे जाणकारांकडून मानले जात आहे.
पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे विश्‍वासू, निष्ठावान व ज्यांच्या शब्दाला पक्षात किंमत आहे अशी जयंत पाटील यांची ओळख आहे. यामुळे त्यांच्या उद्यापासून सुरू होणार्‍या 2 दिवसीय दौर्‍याला महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी ते 7 विधानसभा मतदारसंघांतील पक्ष संघटन, दशा व दिशा याचा आढावा घेणार आहेत. मात्र सिंदखेडराजा सोडला तर 6 मतदारसंघांत फक्त नेते, पदाधिकारीच आहेत, कार्यकर्ते नावालाच, असे गंभीर चित्र आहे. विद्यमान पालकमंत्री हे यापूर्वी देखील पालक होते. सतत वजनदार खात्याचे मंत्री होते. मात्र याउप्परही शिंगणे म्हणजे राष्ट्रवादी, सिंदखेडराजा मतदारसंघ म्हणजे जिल्हा असे विचित्र चित्र कायम आहे. या प्रश्‍नांची उत्तरे 7 व 8 फेब्रुवारी अशा 2 दिवसीय दौर्‍यात शोधण्याची जवाबदारी जयंत पाटील यांच्यावर पक्षाने अर्थात दस्तुरखुद्द शरदचंद्र पवार नामक बलाढ्य नेत्याने सोपविली आहे. दुसरीकडे पालकमंत्र्यांपुरता मर्यादित पक्ष, नॉमिनल जिल्हाध्यक्ष हे चित्र बदलविण्यावर देखील या दौर्‍यात चिंतन होण्याची चिन्हे आहे. पालक व जिल्हाध्यक्ष एकाच मतदारसंघातील, त्यातही जिल्हाध्यक्ष नाझेर काझी हे मातृतीर्थच्या पालिकेचे अध्यक्ष आहेत. मात्र सिंदखेड राजा सोडला तर इतर मतदारसंघांत राष्ट्रवादी म्हणजे नामधारी, असे भीषण, विदारक चित्र आहे. लोकसभेत चारदा पक्ष अपयशी ठरला. 2019 च्या विधानसभेत पक्षाला 6 ठिकाणी डिपॉझिट वाचविता आले नाही! यामुळे या दौर्‍यात जिल्हाध्यक्ष बदलाचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे. पवारांना मानणारे निष्ठावान कार्यकर्ते आवाज उठविणार, असे संकेत आहे. यामुळे अनुभवी व जिल्हाभर ओळख असलेल्या नेत्याची जिल्हाध्यक्षपदी निवड होणे काळाची गरज ठरली आहे. यादृष्टीने माजी मंत्री भारत बोंद्रे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, नानाभाऊ कोकरे, पवारांशी कौटुंबिक संबंध असलेले व किसान आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष प्राचार्य विष्णूपंत पाटील आदी नावे पुढे आली आहेत. मात्र यातील काही नावे वय, प्रकृती या कारणावरून मागे पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या समाजाचा विचार करायचा झाला तर बहुजन चेहरा म्हणून प्राचार्य पाटील वा रेखाताईंचे नाव नाव धक्कादायक रित्या पुढे येऊ शकते. तसेही धक्कातंत्र व राजकीय धक्क्यासाठी पवार हे नाव नावाजलेले आहेच!
राष्ट्रवादी नाव मोठे अन दर्शन…

  • लोकसभेत 4 वेळा पराभूत (दोनदा उमेदवार स्वतः शिंगणे असताना)
  • 2019 च्या विधानसभेत 0 स्कोर, 6 ठिकाणी डिपॉझिट गुल
  • जि.प. मध्ये 60 पैकी 8 जागा, पं.स. मध्ये 120 पैकी 13 जागा
  • पालिकांत 301 पैकी केवळ 21 जागा
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही 4 क्रमांक

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: