खामगाव (घाटाखाली)बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणीची बैठक वादळी ठरण्याची चिन्हे!, निष्ठावंत गटाने खाल्ली उचल, स्वाक्षरी मोहीम

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रदेशाध्यक्षांच्या 2 दिवसीय लक्षवेधी जिल्हा दौर्‍यास अर्थात राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानास आज, 7 फेब्रुवारीपासून शेगाव येथून सुरुवात झाली आहे. मोहिमेपूर्वी पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांच्या निष्ठावंत गटाने उचल खाल्ल्याने व जिल्हाध्यक्ष बदलाच्या मागणीवरून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असल्याने पक्षातील (वि)संवाद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे असल्याने उद्या 8 फेब्रुवारीला बुलडाण्यात होणारी जिल्हा कार्यकारिणीची बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत.
या वादंगात जुने जाणते नेते भारी पडतात, की पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील तरुण तुर्क हे आक्रमण परतून लावतात, याकडे तसेच जयंत पाटील हे वादळ कसे हाताळतात याकडे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यामुळे घाटावरील दौरा प्रामुख्याने सोमवारी पावणेदहाच्या मुहूर्तावर आयोजित जिल्हा कार्यकारिणीची बैठक पक्षातील जुन्या नव्यांच्या वाद व वादंगाला तोंड फोडणारी ठरण्याची दाट शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. यानंतर पार पडणार्‍या बुलडाणा, चिखली व मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या बैठकांनंतर प्रांत अध्यक्ष इतर सर्व पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या समवेत खुला संवाद साधणार आहेत. अगोदरच कमी कार्यकर्ते व त्यातच त्यांच्याशी संवाद साधण्याची पक्ष नेतृत्वाची परंपराच नसल्याने जिल्हा बैठकीतील वादंगाचे पडसाद या चर्चेत उमटण्याची पुरेपूर संभावना असल्याने वाद गडद होण्याची चिन्हे आहेत.
आज शेगाव येथून या दौर्‍याला प्रारंभ झाला. घाटाखाली पक्ष अत्यंत मर्यदित असल्याने पालकमंत्री गटाला आव्हान मिळणे वा जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी होणे कठीणच आहे. मात्र घाटावरील पक्षातर्गत स्थिती तशी नाही. एकट्या बुलडाण्यात पक्षाचे 2 माजी जिल्हाध्यक्ष वास करतात, यापैकी एक पक्ष स्थापनेनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार तर एक बुलडाणा पालिकेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. ते आज बाजूला पडले आहेत. इतर जुन्या नेत्यांची स्थिती अशीच आहे. चिखली तालुका असाच. एस काँग्रेस पासून शरद पवार यांच्यासोबत असणारे माजी मंत्री भारत बोंद्रे, माजी आमदार रेखाताई खेडेकर ते तालुक्यातील लहानमोठे पदाधिकारी उपेक्षितच ठरले आहेत. पक्ष स्थापनेपासून सोबत असणार्‍या या निष्ठावंत गटाने संवाद दौर्‍याचा मुहूर्त साधत पक्षातील विसंवाद चव्हाट्यावर आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी (नाव उघड करण्याच्या मुभेसह) बुलडाणा लाईव्ह सोबत बोलताना सांगितले, की जयंत पाटलांचा दौरा निश्‍चित होताच सुरू झालेली ही मोहीम आता शिगेला पोहोचली आहे. निष्ठावंतांनी लावलेले हे राजकीय टाइम बॉम्ब उद्याच्या बैठकीच्या मुहूर्तावर कसे फुटतात, फुटतात काय की जिल्हाध्यक्ष गटाचे समर्थक पालकाच्या मदतीने हे बॉम्ब डीफ्यूज करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे मलकापूर मार्गावरील बैठकीच्या स्थानी ( राष्ट्रवादी भवन) परिसरात बंदोबस्त असला तर त्याचे कुणाला नवल वाटायचे कारण नसावे..!

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: