बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

रिकाम्‍या खुर्च्या घेताहेत पंख्याची हवा… लाइटही चालूच…जनतेला विजबचतीचा उपदेश, स्‍वतःचे कोरडे पाषाण, बुलडाण्याच्‍या सरकारी कार्यालयांतील चित्र

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ःदरवर्षी विजेचा वापर कसा मर्यादित स्वरूपात करावा हे सरकार अन्‌ प्रशासकीय यंत्रणेकडून कायम उपदेशित केले जाते. मात्र त्‍यांच्‍या सरकारी कार्यालयांमधील अधिकारी अन्‌ कर्मचाऱ्यांवर विजबचतीचा संदेश पोहोचलेला दिसत नसल्याचे चित्र आज, 9 मार्चला बुलडाणा लाइव्‍हच्‍या निदर्शनास आले. अनेक सरकारी कार्यालयांत रिकाम्या खुर्च्यांना पंखे हवा घालत होते. कदाचित या रिकाम्‍या खुर्च्यांना दिवसा दिसत नसावे म्‍हणून लाइटही चालू होते.

कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारी कार्यालयांतील कर्मचारी संख्येवर मर्यादा आणण्यात आल्याने अनेक खुर्च्या रिकाम्या दिसतात. मात्र साहेबांच्या गैरहजेरीत सुद्धा साहेबांच्या खुर्चीवरील फॅन साहेबांच्या खुर्चीची सेवा करताना दिसल्‍या. बुलडाणा तहसील कार्यालयात सध्या कोरोनाने थैमान घातल्याने नेहमीपेक्षा शुकशुकाट होता.मात्र अनेक रिकाम्या खुर्च्यावरील फॅन आणि कक्षातील दिवे सुरूच होते. हेच चित्र जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि प्रशासकीय इमारतीत सुद्धा दिसून आले.

 महावितरण कार्यालयातही बुडाखाली अंधार

 जनतेला विद्युत पुरवणाऱ्या आणि विज बचतीच्या जाहिरातींचा भडिमार करत जनतेला उपदेशाचे डोस पाजणाऱ्या  तसेच सक्तीची वीजबिल वसुली करणाऱ्या महावितरण कार्यालयातील चित्रसुद्धा यापेक्षा वेगळे नव्हते. अनेक खुर्च्यावरील फॅन साहेबांची इमानइतबारे सेवा करताना दिसून आले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: