बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

रेमडेसीविर इंजेक्शन 1400 रुपयांपर्यंतच!; जिल्ह्यातील विक्रेत्‍यांनीही मान्य केले पालकमंत्र्यांचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  रेमडेसीविर इंजेक्शनचा अक्षरशः काळाबाजार काही औषध विक्रेत्‍यांनी सुरू केला असून, अव्वाच्‍या सव्वा दराने या इंजेक्‍शनची विक्री जिल्ह्यात होत आहे. याबाबत बुलडाणा लाइव्‍हने 5 दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध करताच पालकमंत्री आणि जिल्‍हा प्रशासनाने दखल घेऊन तातडीने याबाबत उपाययोजना सुरू करून सामान्‍यांना दिलासा देण्याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. काल बैठकीत प्रशासनाला निर्देश दिल्यानंतर आज, 19 मार्चला औषध विक्रेत्‍यांना सूचनावजा आवाहन करत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसीविर इंजेक्शन 1110 रु ते 1400 रुपयांपर्यंतच उपलब्‍ध करून द्या, असे सांगितले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत औषधी दुकानदारांनी देखील जिल्ह्यामध्ये 1110 ते 1400 रुपयापर्यंत रेमडेसीविर इंजेक्शन ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दर्शविली असून आता जिल्ह्यात 1110 ते 1400 रुपायापर्यंतच रेमडेसीविर इंजेक्शन मिळणार आहे.

कोरोना रुग्णांसाठी हे इंजेक्शन वापरले जाते.  अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.  शिंगणे यांनी रेमेडेसिवीर औषधांच्या दर, उपलब्धतेबाबत जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही बैठक झाली. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके,  केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार, सचिव गजानन शिंदे, अमरावती विभागाचे राम ऐलानी आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन घ्यावे लागत आहे. परंतु काही औषधी दुकानदार रेमडेसीविर इंजेक्शनची खरेदी किंमत कमी झालेली असतानादेखील एमआरपी दराने हे इंजेक्शन विकून एकप्रकारे ग्राहकांची आर्थिक लूट करत असल्याची बाब बुलडाणा लाइव्‍हने प्रसिद्ध केली होती. ही बाब अन्‍न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कळताच त्‍यांनी हे दर कमी कसे होतील यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून रेमडेसीविर खरेदी किमतीवर फक्त 10 टक्केच मार्जिन घेऊन त्याची ग्राहकांना विक्री करावी, असे आवाहन केले. लवकरच कंपनीशी चर्चा करून सर्व विक्रेत्यांना एकाच दरात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णांना हे इंजेक्शन फक्त 1110 रुपयांत मिळणार असून, एकप्रकारे त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: