क्राईम डायरीमुख्य बातम्या

लाखाची लाच मागणारा ‘बाबू’ 50 हजार घेताना जाळ्यात!; सिंदखेड राजाच्या उपविभागीय कार्यालयात कारवाई

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ःशासकीय कामाचे बिल काढून देण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी कंत्राटदाराकडे तब्‍बल 1 लाख रुपये सरकारी बाबूने मागितले. लाचेचा पहिला हप्‍ता 50 हजार रुपये घेतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्‍याला रंगेहात पकडले आहे. ही कारवाई आज, 3 मार्चला दुपारी 1 च्या सुमारास सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्‍या पार्किंगमध्ये करण्यात आली. दीपक शंकरराव गोरे (42, अव्वल कारकून वर्ग 3, ह.मु. चर्चजवळ, सिंदखेड राजा, मूळ रा. गणेश पेठ, वाशिम) असे या लाचखोराचे नाव आहे.

प्रचार व प्रसिद्धी कंत्राटदार असलेले 36 वर्षीय तक्रारदार बुलडाणा येथे राहतात. त्यांचे कामकाजाचे बिल उपविभागीय कार्यालयाकडून येणे होते. त्यासाठी गोरे याने काल 2 मार्चला तक्रारदाराला 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आज लाचेचा पहिला हप्ता 50 हजार रुपये द्यायचे ठरले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. दुपारी 1 च्या दरम्यान तक्रारदाराने 50 हजार रुपयांची रक्कम गोरेकडे सोपवताच पोलीस अधिकाऱ्यांनी त्‍याच्‍यावर झडप घातली. त्‍याने स्वीकारलेली 50 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणाचे पोलीस उप अधीक्षक संजय चौधरी, पोलीस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, पोलीस शिपाई विजय मेहेत्रे, विनोद लोखंडे, चालक पोलीस शिपाई मधुकर गरुड, अर्शीद शेख यांनी पार पाडली.

कुणी लाच मागत असल्यास संपर्क साधा…
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्यावतीने एखाद्या खासगी व्‍यक्‍तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक 8888768218

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: