बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

लॉकडाऊननंतर बुलडाणा शहर गुंडांसाठी मोकळे सोडले का?

अत्‍यावश्यक सेवेतील मंडळींचा सवाल; लुटमार, चोरीच्‍या घटना वाढल्‍या, पेट्रोलिंग वाढविण्याची गरज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊनमुळे संध्याकाळनंतर सामसूम होणारे बुलडाणा शहर सध्या भुरटे चोर, गुंडांच्‍या पथ्यावर पडले आहे. पोलीस कारवाईची भीती केवळ सामान्यांना असून, चोर-गुंडांना जणू रान मोकळे झाले आहे. अगदी चिखली रोडसारख्या मुख्य रस्‍त्यावरही हे गुंड ठाण मांडून बसलेले असतात. अत्‍यावश्यक सेवेतील मंडळींना अडवून लुटण्याचे प्रकार यातून वाढले असून, पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवून अशा गुंडांना आणि भुरट्या चोरांना आवर घालण्याची मागणी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका रुग्‍णालयातील कर्मचारी युवकाला अडवून लुटताना त्‍याच्‍यावर खुनी हल्ला करण्यात आला होता. कालही एका अत्‍यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याला अशाच कटू अनुभवाला सामोरे जावे लागले. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्‍यामुळे कर्तव्‍यदक्ष जिल्‍हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे, असे साकडे अत्‍यावश्यक सेवेतील मंडळींनी घातले आहे.

लॉकडाऊनमुळे सहाच्‍या आत घरात असा नियम सामान्यांनी स्‍वतःलाच घालून दिला आहे. मात्र वैद्यकीयसह अन्य अत्‍यावश्यक सेवेतील मंडळींना आपल्या ड्युटीवर हजर व्‍हावेच लागते. रात्री ड्युटीवर जाताना किंवा परतताना त्‍यांना गुंडांच्‍या दहशतीचा सामना करावा लागत आहे. कधी कोण आडवे येईल आणि लुटेल, याची शाश्वती राहिली नाही. हे गुंड नशेत असल्याने त्‍यांना प्रतिकार करणे म्‍हणजे जिवावर बेतण्यासारखे असते. अनेकदा काहीच न हाती लागल्याने या गुंडांकडून मारहाणही केली जाते. पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन तक्रार करण्याच्‍याही मानसिकतेत हे कर्मचारी राहत नाहीत, इतकी त्‍यांना दहशत भरते. महिला कर्मचारीही रात्रपाळीची ड्युटी आटोपून घरी जीव धोक्‍यात घालतच परतत असतात. त्‍यांच्‍यासोबत अनुचित प्रकार घडण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. लॉकडाऊन केले म्‍हणजे सामान्य नागरिक घरात आणि रस्‍त्‍यावर कुणी येणार नाही, असा प्रशासनाचा समज असला तरी गुंड आणि चोरांसाठी मात्र हा लॉकडाऊन जणू संधी झाला आहे. त्‍यांचा वावर शहरात सर्वत्र दिसून येतो. त्‍यामुळे गेल्या काही महिन्यांत चोरीच्‍या घटनाही वाढल्‍या आहेत. लुटमारीच्‍या बहुतांश घटना दहशतीपोटी समोरच येत नाहीत.

पेट्रोलिंग वाढवून गुंडांना आवरण्याची गरज

पोलिसांनी प्रशासनाने किमान मुख्य रस्‍त्‍यावर पेट्रोलिंग वाढविण्याची गरज आहे. गल्ली, बोळात नागरिक जागे असतात. ते धावून येऊ शकतात. मात्र मार्केट, मुख्य रस्‍ते सुनसान असतात. या ठिकाणी मदतीसाठी पुकारा केला तरी कुणी वेळेवर येईलच याची शाश्वती नसते. त्‍यामुळे पेट्रोलिंग वाढवणे आणि बंदोबस्‍तासाठी फिक्‍स पॉईंट लावणे गरजेचे असल्याचे मत अत्‍यावश्यक सेवेतील मंडळी व्‍यक्‍त करत आहेत. कर्तव्‍यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुलडाणा शहरातील या गुंडगिरीला चाप लावावा, अशी अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: